pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

“नशा मुक्त भारत पंधरवडा”चा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते शुभारंभ

जालना जिल्हा व्यसनमुक्त करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा -- जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड,- सर्वांनी घेतली व्यसन न करण्याची शपथ - 26 जुनपर्यंत "नशा मुक्त भारत पंधरवडा" अभियान - नशा मुक्तीसाठी विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार

0 1 7 4 1 4

जालना/प्रतिनिधी,दि. 12

व्यसनाचे दुष्परिणाम अत्यंत वाईट असतात, त्यामुळे कुणीही व्यसनाच्या आहारी जावु नये. आपला जालना जिल्हा व्यसनमुक्त करण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले.

सामाजिक न्याय विभाग, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यामाने आयोजित “नशा मुक्त भारत पंधरवडा” अभियानाचा आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, समाजकल्याणचे सहायक आयुक्त दत्तात्रय वाघ, समाज कल्याण अधिकारी डॉ. डि.एस. कांबळे, जिल्हा सरकारी अभियोक्ता बाळासाहेब इंगळे, नशाबंदी मंडळाचे जिल्हा समन्वयक बी.एस. सय्यद, तेजस जनविकास संस्थेचे अध्यक्ष शिवाजी तायडे, बालकल्याण समितीचे अध्यक्ष एकनाथ राऊत आदींसह विभागप्रमुख, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सर्व उपस्थितांनी व्यसन न करण्याची शपथ घेतली.

जिल्हाधिकारी म्हणाले की, निरोगी जीवनासाठी व्यसनांपासून दूर राहणे अत्यंत गरजेचे आहे. व्यसनमुक्त समाजासाठी सर्वांनीच पुढाकार घेणे आवश्यक आहे. आपल्या जालना जिल्हयात “नशा मुक्त भारत पंधरवडा” यशस्वी करण्याकरीता सर्वच अधिकाऱ्यांनी  जबाबदारीची जाणीव ठेवून व्यसनमुक्तीसाठी  प्रभावीपणे जनजागृती करावी. भावी पिढीला व्यसनांपासून दूर ठेवण्याकरीता विद्यार्थ्यांना आतापासूनच व्यसनाच्या घातक दुष्परिणामांची माहिती द्यावी. व्यसन किती वाईट असते. हे त्यांच्या मनावर बिंबवावे. शिक्षण विभागाने यासाठी पुढाकार घेऊन व्यसनमुक्तीसाठी या पंधरवडयात विविध स्पर्धांचे आयोजन करावे. समाजकल्याण विभागाने व्याख्याने, पोस्टर स्पर्धा आयोजित कराव्यात. आरोग्य विभागाने व्यसनमुक्तीसाठी समुपदेशन कार्यशाळा घ्याव्यात. प्रसारमाध्यमानीही व्यसनाविरोधात मोठया प्रमाणात प्रचारप्रसिध्दी करावी. व्यसनमुक्तीच्या या लढयात सर्वांनीच उत्स्फुर्तपण सहभागी व्हावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले.

प्रास्ताविकात श्री. वाघ म्हणाले की, आंतरराष्ट्रीय मादकद्रव्य पदार्थ सेवन विरोधी (२६ जून)  दिनाचे औचित्य साधून दि. 12 ते 26 जून 2023 या कालावधीत जालना जिल्ह्यात  “नशा मुक्त भारत अभियाना”अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये महिला मंडळे, युवकमंडळे, स्थानिक स्वयंसेवी संस्था, अनुदानित संस्था, महाविद्यालये, माध्यमिक विद्यालये, प्राथमिक विद्यालये, अपंग संस्था, आश्रमशाळा,  लोकप्रतिनिधी, स्थानिक कार्यकर्ते यांच्या सहभागाने जनजागृती मोहिम, रॅली, चर्चासत्रे, कार्यशाळा, प्रतिज्ञा, पथनाट्य, एकांकिका, पोस्टर्स, स्लोगन्स इत्यादी स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे.

नशाबंदी मंडळाचे जिल्हा समन्वयक बी.एस. सय्यद म्हणाले की, नशाबंदी मंडळ हे मागील 57 वर्षांपासून महाराष्ट्रात व्यसनाविरोधात प्रचार, प्रसार, प्रबोधन करीत आहे. मंडळाचे मख्य ध्येय मतपरिवर्तनातून व्यसनमुक्त समाज निर्माण करणे, हे आहे. मुखाची घाण, शरीर रोगाची खाण –  कारण धुम्रपान व मद्यपान..! चरस, अफू, भांग, गांजा ! उध्वस्त करील जीवनातील मजा..!  ही मंडळाची टॅगलाईन आहे.  “नशा मुक्त भारत पंधरवडा” अभियानात सर्वांनी सहभागी होऊन व्यसना विरोधात जनजागृती करावी.

यावेळी नशामुक्तीबाबतच्या विविध पोस्टरचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. शेवटी सर्वांनी व्यसन न करण्याची शपथ घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शासकीय निवासी शाळेचे मुख्याध्यापक  डॉ. दिलीप गिरी यांनी केले. डि.एस. कांबळे यांनी आभार मानले.

 

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे