शिक्षकांनी विद्यार्थ्यात मूल्यसंस्कार जाणीवपूर्वक रुजवावेत -जमीर शेख
महेंद्र वाकोडकर यांच्या अभिनयाने विद्यार्थी भारावले..

जालना/प्रतिनिधी, दि.8
मानवी जगण्यातील संवेदना जागृत करण्यासाठी आणि माणसाला माणूस म्हणून जोपासणारा मूल्यसंस्कार हा साने गुरुजींच्या ‘ श्यामची आई ‘ या कथांमधून उमटत आहे. बालमनावर हाच मूल्यसंस्कार रुजविण्यासाठी शिक्षकांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत,असा विचार साने गुरुजी कथामालेचे कार्याध्यक्ष जमीर शेख यांनी मांडला.
श्रीमती जमनाबाई बाळाराम काबरा विद्यालय व नवभारत उच्च माध्यमिक विद्यालयात सोमवारी ( ता.८) हेलस साने गुरुजी कथामालेचे संस्थापक अध्यक्ष स्व. दत्तात्रय हेलसकर दहाव्या स्मृतिदिन अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साने गुरुजी कथामालेचे कार्याध्यक्ष जमीर शेख हे होते. या वेळी साने गुरुजी कथामालेचे जिल्हाध्यक्ष डॉ.सुहास सदाव्रते, प्राचार्य व्ही.के.जाधव, ज्येष्ठ शिक्षक एस.बी.बोरकर, माजी प्राचार्य नंदकुमार काळे, कथामाला शाखेचे अध्यक्ष संजय निकम, संदीप इंगोले यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात स्व.दत्तात्रय हेलसकर यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त अभिनेते महेंद्र वाकोडकर यांचा ‘ श्यामची आई ‘ हा नाट्य प्रयोग सादर करण्यात आला. एकपात्री नाट्य प्रयोगातून अभिनेते वाकोडकर यांनी साने गुरुजी लिखित ‘ श्यामची आई ‘ या ग्रंथातील विविध कथां सादर करीत मुलांना मंत्रमुग्ध केले. एकपात्री नाट्यप्रयोगातून ‘श्यामचे पोहणे, वटसावित्रीचे व्रत’ अशा सरस कथांमधून मुलांनी अनोखे भावविश्व अनुभवले.अभिनेते वाकोडकर यांच्या दमदार अभिनयाने विद्यार्थी भारावले तर कथांमधून विविध भावछटांनी कार्यक्रमात अधिक रंगत वाढली. कार्यक्रमात काही कथा सादरीकरणाने उपस्थिती विद्यार्थ्याच्या डोळ्याच्या कडा पाणावल्याचा अनुभव दिसून आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यालयातील विद्यार्थिनी आचल म्हस्के, पायल खरात,प्राची गडकर,प्राची जाधव यांनी स्वागत गीत गायले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅ. अरुण आहेर यांनी केले. आभार राजेंद्र जगताप यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता माजी प्राचार्य नंदकुमार काळे यांनी सादर केलेल्या पसायदानाने करण्यात आली. कार्यक्रम आयोजनासाठी दिनकर ससाणे, सुनील बनसोडे,रमेश इंगळे, संजय कुलकर्णी, कैलास भूतेकर, रवींद्र मोरे यांनी प्रयत्न केले.
————————————————————-
संबोधीचे सूमधूर गाणे..
स्व.दत्तात्रय हेलसकर स्मृतिदिन अभिवादन कार्यक्रमात बालगायिका संबोधी संदीप इंगोले हिने ‘ ये मेरे वतन के लोगो ‘ या सादर केलेल्या देशभक्तीपर गीताने उपस्थिती भारावले. कार्यक्रमात संबोधीने गायलेल्या ‘ हीच आमुची प्रार्थना ‘ गीताला उपस्थिती विद्यार्थ्यानी उस्फूर्त दाद दिली.
————————————————————–
एकपात्री नाट्य प्रयोगाचा शुभारंभ..
हेलस साने गुरुजी कथामालेचे संस्थापक अध्यक्ष स्व.दत्तात्रय हेलसकर यांच्या स्मृतिदिनी अभिनेते महेंद्र वाकोडकर यांच्या एकपात्री नाट्यप्रयोगाची जबाबदारी साने गुरुजी कथामालेने घेतली असल्याचे सांगून ‘श्यामची आई’ या नाट्यप्रयोगाचा नवा शुभारंभ करण्यात आला
असल्याचे साने गुरुजी कथामालेचे जिल्हाध्यक्ष डॉ.सुहास सदाव्रते यांनी सांगितले.
———————–————————––————



