‘माझ्या नणंदबाईकडे खूप माल आहे, त्यांना कडक नोटा आवडतात,’ नवनीत राणांची यशोमती ठाकूरांवर घणाघाती टीका

मोर्शी/त्रिफुल ढेवले,दि.6
अमरावती : तिवसा मोझरी म्हटलं की यशोमती ठाकूर आणि नवनीत राणा यांच्यामधील वाद काही नवा नाही. निवडणूक येते तशी यो दोन्ही महिला राजकारण्यांतील वाद शिगेला पोहोचतो. यामध्येच आता माजी खासदार नवनीत राणांनी यशोमती ठाकूरांना स्वत:च्या नणंदेची उपमा देत त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. नवनीत राणा म्हणाल्या, देवासमोर वाढलेलं ताट खाण्याचं काम माझ्या नणंदबाईने केलं आहे. माझी नणंदबाई तीन टर्मपासून मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करत आहे. पण दहा वर्षात मतदारसंघाला मागे नेण्याचं काम माझ्या नणंदबाईने केलं आहे. त्यांना फक्त कडक नोटा आवडतात, असे नवनीत राणा यांनी म्हटले.
तिवसा विधानसभा मतदारसंघात भाजपा व महायुतीचे अधिकृत उमेदवार राजेश श्रीरामजी वानखडे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत माजी खासदार नवनीत राणा यांनी मतदारसंघातील विकासकामांवरुन आमदार यशोमती ठाकूर यांचा समाचार घेतला आहे. या मतदारसंघांचे नणंदबाईने वाटोळे करुन ठेवले अशी घणाघाती टीका केली. तर अन्य काही मुद्द्यांकडेही नवनीत राणांनी लक्ष वेधले.
‘महाआघाडी नव्हे तर महाअनाडी’; शिवरायांवरूनही मोठे वक्तव्य, योगी आदित्यनाथांचा विरोधकांवर घणाघात
नवनीत राणा म्हणाल्या, माझ्या नणंदबाईंना फक्त नोटा आवडतात. बाकी कार्यकर्ते काय सतरंजी उचलतात. माझ्या नणंदबाईने जाती जातींमध्ये विभाजन करून मते घेतली आहेत. मेलेल्या माणसाच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा काम नणंद बाई करत आहे. तरुणांना रोजगार उपलब्ध दिला नाही. पण तिकीट देणार म्हणून दर्यापूरच्या उमेदवारचे घर लुटले आहे, यातऱ्हेने नणंदबाईने खूप कमावले आहे. असा दावा नवनीत राणा यांनी केला आहे.
नवनीत राणा पुढे म्हणाल्या, नणंदबाईंना १५ वर्षांनंतर महिलांची आठवण झाली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मोझरी येथील स्थानचा आराखडा तुम्ही वाचा. या आराखड्यासाठी जेवढा निधी आमच्या सरकारने दिला. पण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या आराखड्याचा पैसा या खाऊ शकतात, तर तुम्ही विचार करा या मतदारसंघाचे नणंदबाईने किती वाटोळे केले असेल?
यासोबतच नवनीत राणांनी राहुल गांधींनाही लक्ष्य केले आहे. त्या म्हणाल्या, ‘राहुल गांधीचा खटाखट पैसा आला का? महिलांना १५०० ऐवजी २१०० रुपये देणार आहात म्हणता. पण तुम्ही तिजोऱ्या खाली केल्या स्वतःच्या मुलाच्या भविष्यासाठी केला आहे. स्वतःचं घर भरण्यासाठी तुम्ही तिजोऱ्या फोडल्या. पण आम्ही गोरगरीब लोकांना मदत करायला तिजोरी खाली केली. राहुल गांधी संविधान घेऊन फिरतात त्यांना विचारा संविधानामध्ये किती पान आहेत? असा खडा सवालही राणांनी केला आहे.
‘खोटं एकच वेळ चालतं पुन्हा पुन्हा चालत नाही. नणंदबाईकडे खूप माल आहे, कडक नोटा आहेत. त्यांनी दिले तर घ्याच खूप कमावले आहे. निवडणुकीसाठी शेत विकावं लागतं म्हणतात पण त्यांनी कागदपत्रे दाखवावीत, आज जो जिल्ह्याचा खासदार झाला आहे तो वॉचमन झाला आहे, घरचा वॉचमन, असे म्हणत यशोमती ठाकुरांसोबतच बळवंत वानखेडेंनाही टीका केली आहे.