जागतिक महिला दिन कार्यक्रम उत्साहात संपन्न नवीन सक्षम पिढी घडविण्याचे काम महिलांच्या हाती – खासदार डॉ.कल्याण काळे

जालना/प्रतिनिधी,दि. 7
आज शासनाच्या विविध विभागात महिला काम करत आहेत. महिला दिनी महिलांनी आपल्या कामात आलेले अनुभव, सचोटी आणि बारकावे कथन करावेत. स्त्री शिवाय पुरुष कधीही सर्वगुण संपन्न होवू शकत नाही. स्त्री शक्ती आपल्या आजुबाजुला असल्यानेच आपले नियोजन व्यवस्थितपणे पार पडते. बालकांना सांभाळण्याचे काम महिला अत्यंत उत्कृष्टपणे करत असतात. तरी नवीन सक्षम व संस्कारक्षम पिढी घडविण्याचे काम महिलांच्या हाती आहे, असे प्रतिपादन खासदार डॉ.कल्याण काळे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात जागतिक महिला दिन व बेटी बचाओ बेटी पढाओ उपक्रम दशकपुर्ती सोहळ्यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजेंद्र पाटील, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कोमल कोरे, महापालिका आयुक्त संतोष खांडेकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राजु सोळुंके, तहसीलदार छाया पवार, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गजानन इंगळे यांची उपस्थिती होती.
खासदार डॉ.काळे म्हणाले की, स्वातंत्र्यपूर्व, स्वातंत्र्य चळवळीसह स्वातंत्र्योत्तर काळात महिलांचे अमुल्य योगदान आहे. जालना जिल्ह्यातील मराठवाडा मुक्ती संग्रामातील थोर स्वातंत्र्यसेनानी दगडाबाई शेळके यांनी आपले लग्न बाजुला ठेवून निजामाच्या फौजेला मोठ्या शौर्याने सामोरे गेल्या असल्याची बाबही त्यांनी अधोरेखित केली. तसेच शासनामध्ये गावपातळीवर उल्लेखनीय काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा सेविका यांच्या कार्याचे कौतूकही त्यांनी यावेळी केले.
जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ म्हणाले की, नारी शक्ती ही खरी शक्ती असते. कुठल्याही क्षेत्रात महिलांना संधी दिल्यास त्या पुरुषांपेक्षा जास्तीचे काम करताना दिसुन येतील. जालना जिल्ह्यातील महिला घराबाहेर पडून प्रत्येक क्षेत्रात नावलौकिक प्राप्त करत आहेत. महिलांना पुर्वीच्या तुलनेत आता जास्त संधी मिळण्याची दारे खुली झाली आहेत. महिला सर्वच क्षेत्रात पुढे जात आहेत. स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तर समतोल राखण्यासाठी महिलांची भूमिका महत्वाची ठरणारी आहे. असे सांगून जालना जिल्ह्यातील महिला सक्षमीकरणासाठी उमेदच्या माध्यमातून नवीन छोटे-मोठे उद्योग सुरु करण्याचा प्रयत्न करु, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कोमल कोरे यांनी तर सुत्रसंचालन नूतन मघाडे यांनी केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे यांची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
यावेळी जागतिक महिला दिन व बेटी बचाओ बेटी पढाओ उपक्रम दशकपुर्ती सोहळ्यानिमित्त उत्कृष्ट कार्य केलेल्या प्रशासकीय सेवेतील महिला अधिकारी रिता मैत्रेवार यांच्यासह उत्कृष्ट कार्य केलेल्या महिला डॉक्टर्स, महिला पोलिस अधिकारी, आदर्श पर्यवेक्षिका,आरोग्य सेविका, ड्रोन दीदी, आशासेविका, मुख्यसेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्यासह जिल्ह्यात इयत्ता दहावीमध्ये विशेष प्राविण्य मिळविलेल्या मुलींचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मतदनीस, संबंधित यंत्रणेसह विविध विभागाच्या महिला अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.