pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

जालना जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी राज्यशासन कटीबध्द – पालकमंत्री अतुल सावे

   भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न

0 1 7 4 1 4

जालना/प्रतिनिधी,दि.26

जालना जिल्ह्यातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या प्रगतीकरीता तसेच जिल्हयाच्या सर्वांगिण विकासासाठी राज्य शासन कटीबध्द आहे, असे प्रतिपादन राज्याचे गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे  यांनी केले.
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त जालना येथील पोलीस मुख्यालय मैदानावर श्री. सावे यांच्या हस्ते आज मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी माजी मंत्री तथा आमदार राजेश टोपे, आमदार नारायण कुचे, आमदार राजेश राठोड, माजी मंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  वर्षा मीना,  जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आदींसह स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार व नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.
पालकमंत्री अतुल सावे आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणाले की, दि. 15 ऑगस्ट, 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. या स्वतंत्र देशाची राज्यघटना तयार करण्याचे महान कार्य घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले.  26 जानेवारी, 1950 रोजी भारत देश प्रजासत्ताक झाला आणि अंतिम सत्ता प्रजेच्या हाती सोपविण्यात आली.  आपला भारत हा एक मोठा लोकशाही देश आहे. ज्या देशाची सर्व सत्ता प्रजेच्या हाती असते, तो देश म्हणजे प्रजासत्ताक होय.
जालना जिल्हा विकासाभिमुख जिल्हा म्हणून ओळखला जातो, असे सांगून पालकमंत्री म्हणाले की, अनेक योजनांच्‍या  यशस्‍वी अंमलबजावणीमुळे  जिल्हा सतत अग्रेसर राहिला आहे. जिल्हयातून जाणारा समृध्दी महामार्ग, रेल्वेमार्ग, पीट लाईन, नुकतीच मुंबईसाठी सुरु करण्यात आलेली वंदे भारत रेल्वे, आयसीटी कॉलेज, ड्रायपोर्ट यामुळे जालना जिल्हा वेगाने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. यावर्षी अत्यल्प पावसामुळे पाणीटंचाईचे सावट असले तरी टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी शासन व प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी शासन सदैव कटीबध्द आहे.  प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम – 2023  मध्ये चार लाख 18 हजार शेतकऱ्यांना रुपये  152 कोटी अग्रीम वितरीत करण्यात आला आहे. स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत     8 हजार 856 शेतकऱ्यांना 3 कोटी  59 लक्ष रक्कम वितरीत करण्यात आली आहे. पुर्नरचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना आंबिया बहार-2022-23 मध्ये 24 हजार शेतकऱ्यांना रुपये 85 कोटी नुकसान भरपाई वितरीत करण्यात आली आहे. तसेच एक रुपयामध्ये सर्व समावेशक पिकविमा योजना रब्बी -2023 मध्ये जिल्ह्यात सहा लक्ष 10 हजार 884 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतंर्गत अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांसाठी नवीन विहिरी व इतर लाभाकरीता या वर्षासाठी  रुपये 15 कोटी मंजूर करण्यात आले असून  362 लाभार्थ्यांच्या विहिरीचे कामे सुरु झाली आहेत. तर बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतंर्गत रुपये 45 लक्ष मंजूर करण्यात आले असून 8 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.  शेतकऱ्यांच्या हितासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना राज्य सरकार निश्चितपणे करेल, अशी ग्वाही पालकमंत्री यांनी दिले.
पालकमंत्री पुढे म्हणाले की, स्टील व सीडस उद्योगानेसुध्दा आपला जिल्हा ओळखला जातो. यापुढे जाऊन सिल्क अर्थात रेशीम शेती व त्यावरील प्रक्रिया उद्योगाने जिल्हयाची नवीन ओळख  निर्माण होत आहे. चालू वर्षात नवीन तुती लागवड करण्यासाठी जिल्ह्याला 350 एकर लक्षांक देण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात सुमारे दोन हजार 46 एकरकरीता नोंदणी झाल्याने जालना जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. जालना येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ॲटोमॅटीक रिलींग मशीनचीही उभारणी करण्यात आली असून याव्दारे जागतिक स्तरावरील उत्कृष्ट दर्जाचे रेशीम सुताची निर्मिती करण्यात येत आहे. यामुळे अनेक बेरोजगारांना रोजगार मिळाला असून  या ठिकाणी पैठणी साडीकरीता आवश्यक उच्च दर्जाचे सूत तयार होत आहे.  रेशीम सूत उत्पादनाची पुढील प्रक्रीया जसे हातमागावर कापड बनविणेचे काम लवकरच जालना येथे सुरु करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे रेशीम कोषांवर सर्व प्रक्रिया जिल्ह्यातच होऊन जालना सिल्क ब्रॅण्डचा रेशीम कपडा जालना येथेच तयार होईल.
छोट्या व्यवसायिकांना लघु व्यवसाय सुरु करण्यासाठी केंद्र शासनाकडून पीएम स्वनिधी कर्ज योजना सुरु करण्यात आली आहे. या अंतर्गत राज्यात उद्दिष्टपूर्तीमध्ये जालना जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे.  जिल्ह्यात 11 हजार 53 छोट्या व्यावसायिकांना सुमारे 12 कोटी 11 लक्ष रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. पी. एम. विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजने अंतर्गत जिल्हयातील मनपा, नगर पालिका व ग्रामपंचायत स्तरावर  एकूण सात हजार 852 कारागीरांची नोंदणी झाली आहे. याबाबत लवकरच प्रक्रिया पूर्ण करुन पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.  अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध कर्ज व्याज परतावा योजने अंतर्गत जालना जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे तीन हजार 30 लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर रुपये 31 कोटी इतका व्याज परतावा जमा करण्यात आला आहे. तर सारथी संस्थेमार्फत पात्र लाभार्थ्यांना विविध योजनेतंर्गत शिक्षण, रोजगार व स्वयंरोजगारासाठी आर्थिक लाभ देण्यात येतो, असेही त्यांनी सांगितले.
पालकमंत्री म्हणाले की, प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत जिल्ह्यात चार लाख 72 जणांना आयुष्यमान भारत कार्डचे वाटप करण्यात आले आहे. सर्वसामान्य जनतेने सण उत्साहात साजरे करावेत यासाठी गौरी गणपती व दिवाळी सणानिमित्त जिल्हयातील 3 लाख 44 हजार  शिधापत्रिकाधारकांना “आनंदाचा शिधा” वाटप करण्यात आला आहे.  तसेच  श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठा  व शिवजंयतीनिमित्त सध्या “आनंदाचा शिधा” शिधापत्रिकाधारकांना देण्यात येत आहे. सर्वसामान्यांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी शासन नेहमीच काळजी घेत आले आहे. यशवंतराव चव्हाण वैयक्तिक घरकुल योजनेतंर्गत विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या सात हजार 720 लाभार्थ्यांचे आणि  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैयक्तिक घरकुल योजनेतंर्गत विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या दोन हजार 276 लाभार्थ्यांचे घरकुलसाठीचे प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे सादर करण्यात आले आहेत.  तर मोदी आवास घरकुल योजना सन 2023-24 अंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या चार हजार 634 घरकुलांना मंजुरी मिळाली आहे.
शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत जिल्हयातील एकूण 44 गावांमध्ये तीन हजार 397 कामांसाठी रुपये 77 कोटींच्या आराखड्यास जिल्हास्तरीय समितीमार्फत मान्यता मिळाली आहे. तर एक हजार 241 कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यापैकी 783 कामे पूर्ण झालेली असून उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत. गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेतंर्गत मागील वर्षात पंधरा जलसाठ्यातून एक लक्ष 76 हजार घनमीटर इतका गाळ काढण्यात आला आहे. हा गाळ  239 शेतकऱ्यांच्या शेतात टाकून जमीन सुपीक करण्यात आली आहे. चालू वर्षात जास्तीतजास्त जलसाठे गाळमुक्त करण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले.
भाषणानंतर  पालकमंत्री यांच्या हस्ते स्वातंत्र्यसैनिकांच्या पत्नीचा यथोचित सत्कार करण्यात आला. उपस्थित लोकप्रतिनिधी, मान्यवर व नागरिकांची पालकमंत्री यांनी भेट घेतली.  महारेशीम अभियान-2024 अंतर्गत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. केंद्र शासनाच्या अटल भूजल समृध्द ग्रामस्पर्धेतील विजेत्या ग्रामपंचायत अंबा, ता. परतूर, बोररांजणी, ता. घनसावंगी व हातडी, ता. घनसावंगी ग्रामपंचायतींच्या सरपंचांचा यावेळी सन्मान करण्यात आला. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांमध्ये उल्लेखनीय कार्य करणारे  श्री गणपती नेत्रालय आणि महिला रुग्णालय, जालना यांच्या अधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. सर्वोत्कृष्ट कार्य करणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी पालकमंत्री यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच मतदार नोंदणीत उत्तम काम केल्याबद्दल विद्यार्थी व कर्मचाऱ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
प्रारंभी ध्वजारोहण झाल्यानंतर पोलीस दलाच्यावतीने राष्ट्रगीत व राज्यगीत सादर करण्यात आले व राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली. यानंतर पालकमंत्री यांनी पोलीस परेडचे निरीक्षण केले. यावेळी पोलीस,  होमगार्ड, सैनिक शाळेचे विद्यार्थी, एनसीसीच्या विद्यार्थ्यांना सलामी देण्यात आली. विविध विभागांनी चित्ररथाव्दारे योजनांचे सादरीकरण केले. शेवटी विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर सुंदर नृत्य सादर केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे