आदर्श इंग्लिश स्कूल, जामखेड येथे महाराष्ट्र दिन उत्साहात संपन्न
विद्यार्थ्यांच्या नेत्रदीपक कामगिरीचा गुणगौरव सोहळा आयोजन

अंबड/प्रतिनिधी,दि.2
जामखेड तालुका अंबड येथील शैक्षणिक क्षेत्रात नावाजलेली आदर्श इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मध्ये एक मे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. “मंगल देशा, पवित्र देशा,महाराष्ट्र देशा,प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा!” मंगलमय वातावरणात ऐतिहासिक महाराष्ट्र दिनानिमित्त आकर्षक सजावट, रांगोळी साकारत महाराष्ट्र गौरव गिताने भारवलेल्या वातावरणात संस्था सचिव सौ.आशा गंगाधर पांढरे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.
याप्रसंगी मान्यवर पालक माता भगिनींच्या उपस्थितीमध्ये शैक्षणिक वर्ष 2024/25 मध्ये विशेष प्राविण्य मिळवत नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. मान्यवरांच्या हस्ते पालकांसमवेत विद्यार्थ्यांना मेडल,प्रशस्तीपत्र देत गौरव करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद तर पालकांना आपल्या पाल्याची कामगिरी व कौतुक सोहळा पाहून अभिमान दिसून आला.
संस्थापक अध्यक्ष डॉ.गंगाधर पांढरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनानुसार गुणगौरव सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करण्यासाठी अमूल्य प्रेरणा मिळेल असे मत उपस्थित पालकांनी व्यक्त केले तर शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण शैक्षणिक वर्षात आयोजित केलेल्या विविध उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
डॉ. महादेव पांढरे यांच्या विशेष नियोजन नुसार आयोजित महाराष्ट्र दिन सोहळ्याचे प्रस्ताविक पल्लवी भोजने यांनी केले तर आभार प्रदर्शन मोमीन मॅडम यांनी व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षिका शिक्षक कार्यालयीन कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.