न्हावा शेवा पोर्ट मध्ये चालकांना मारण्यात येत असल्याचा खोटा व्हिडीओ व्हायरल करणा-या आरोपीवरती न्हावा शेवा पोलीसांकडून कारवाई.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.18
एका अनोळखी इसमाने ‘न्हावा शेवा पोर्ट, रायगड येथे एका सरपंचांच्या मुलाचा अपघात झाल्यामुळे त्याने १११ चालकांना मारण्याची शपथ घेतली आहे, चालकांना दिसेल तिथे कापुन टाकले जात आहे, आतापर्यंत १५ ते २० चालकांना मारून टाकलेले असुन पोलीस देखील चालकांची मदत करत नाहीत. चालकांनी न्हावा शेवा पोर्टकडे जावु नये’ अशा आशयाचा व्हिडीओ सोशल मिडीयावरती टाकलेला होता. सदरच्या व्हायरल व्हिडीओमुळे ट्रेलरचालक व ट्रांसपार्टर्स मध्ये भिती निर्माण झालेली होती. सदरची बाब ही पुर्णपणे खोटी असल्याने व खोडसाळपणे ती सोशल मिडीयाच्या माध्यमातुन व्हायरल केली जात असल्याने त्याबाबत न्हावा शेवा पोलीस ठाणेमध्ये सदरचा व्हिडीओ बनविणा-या अनोळखी इसमाच्या विरोधात दिनांक १३/१/२०२४ रोजी माहिती तंत्रज्ञान कायदा २००१ अंतर्गत गुन्हा नोद करण्यात आलेला आहे.
न्हावा शेवा पोर्टमध्ये दररोज हजारो ट्रेलर वाहनांची व्यवसायिक दृष्टिकोनातुन आवक जावक होत असते. सदरच्या खोटया व्हिडीओमुळे पोर्टमध्ये येणा-या ट्रेलरचालकांच्या मनामध्ये भिती निर्माण झाल्यामुळे सदरच्या आरोपीस शोध घेवुन त्याच्यावरती कारवाई करण्यासाठी पोलीस उपायुक्त परिमंडळ २ पनवेल पंकज डहाणे यांनी आदेश दिलेले होते. सदरप्रकरणी सहा. पोलीस आयुक्त पोर्ट विभाग धनाजी क्षीरसागर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक अमोल शिंदे, पोलीस उपनिरीक्षक नितीन सांगळे, पोलीस हवालदार वैभव शिंदे, विशाल हिंदोळा, दयानंद कवलगीर, जितेंद्र दबके व राम राठोड यांच्या पथकाने आरोपी पंकज रामजी गिरी रा. वडोदरा, गुजरात या आरोपीस त्याच्या वडोदरा, गुजरात येथील कार्यालयातुन ताब्यात घेतलेले असुन त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची प्रकीया चालु आहे. तपासामध्ये आरोपीने त्याला मिळालेल्या ऐकीव माहितीच्या आधारे सदरची अफवा पसरवलेली होती असे समोर आले असुन त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. न्हावा शेवा पोलीस ठाणेकडुन सर्व ट्रेलरचालकांना कोणत्याही अफवेवरती विश्वास न ठेवता कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन मदतीसाठी ११२ या कमांकावरती संपर्क करण्याचे आवाहन पंकज डहाणे पोलीस उप आयुक्त परिमंडळ २,पनवेल, नवी मुंबई यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.