जालना लोकसभा निवडणूक प्रचारात महाविकास (इंडिया) आघाडीचे उमेदवार डॉ.कल्याण काळे यांनी जोरदार मुसंडी मारली असून गावागावात, वाड्या, तांडे आणि शहरी भागात सर्व सामान्य जनता महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे चित्र दिसून येत असल्यामुळे प्रतिस्पर्धी भाजपा महायुतीचे उमेदवार रावसाहेब पाटील दानवे यांचा पराभव निश्चीत असल्याचा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे.
जालना लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.कल्याण काळे यांनी मतदार संघातील जालना, भोकरदन, बदनापूर, सिल्लोड, फुलंब्री, पैठण या सहाही विधानसभा मतदार संघात प्रत्येक गावात, वाड्या, वस्त्या आणि तांड्यांवर प्रत्यक्ष जावून मतदारांच्या भेटीगाठी घेत त्यांच्याशी संवाद साधला आहे. या प्रचार दौऱ्यात ठिक-ठिकाणी त्यांना उत्स्फुर्त असा प्रतिसाद मतदारांकडून मिळत आहे. विशेष करून शेतकरी, शेतमजुर, कामगार, बेरोजगार युवक आणि छोट्या व्यावसायिकांकडून महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.कल्याण काळे यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे. या प्रचार दौऱ्यात डॉ.कल्याण काळे हे कॉर्नर बैठका, छोट्या सभा आणि मतदारांशी थेट संवाद साधण्यावर भर देत असून मागील 10 वर्षात केंद्रातील मोदी सरकार सर्व पातळ्यांवर कसे अपयशी ठरले हे मतदारांना पटवून सांगत आहेत. कापूस, सोयाबीन, तुर, मुग आदि शेतमालाला पुरेसा भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. एकीकडे शेतमालाला भाव मिळत नसतांना दुसरीकडे रासायनिक खत आणि बियाण्यांचे दर मात्र सातत्याने वाढवून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे काम मोदी सरकारने मागील 10 वर्षात केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यासह सर्व सामान्य जनता आणि सर्वच घटक मोदी सरकारच्या कारभारावर तिव्र नाराज असल्याचे चित्र मतदार संघात प्रचार करत असतांना दिसून आल्याचे डॉ.काळे यांनी सांगीतले. ग्रामीण भागासह शहरी भागातील मतदार देखील या निवडणूकीत महाविकास आघाडीच्या बाजुने उभा असल्यामुळे यावेळी आपला विजय निश्चीत असल्याचा दावा डॉ.कल्याण काळे यांनी केला आहे.