बांधकाम कामगार संघटनेचे सरकारी कामगार अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

विरेगाव/प्रतिनिधी,दि.23
जालना-बांधकाम कामगारांच्या नोंदणी व नूतनीकरणासाठी ग्रामसेवकाच्या प्रमाणपत्राची अट रद्द करण्यात यावी, या व इतर मागण्यांसाठी जालना जिल्हा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने शुक्रवारी ( दि. 24) जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, जिल्हा सरकारी कामगार अधिकारी उपस्थित नसल्याने त्यांच्या कॅबिनला निवेदन डकविण्यात आले.
जालना जिल्हा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष सुधाकर कोथळकर, उपाध्यक्ष काॅ. गोविंद आर्दड,दीपक शेळके, सरचिटणीस गजानन पातरफळे , कार्याध्यक्ष प्रभाकर चोरमारे, कोषाध्यक्ष सुभाष मोहिते यांच्या नेतृत्वाखाली हे धरणे आंदोलन करण्यात आले.
राज्य सरकारच्या कामगार कल्याण मंडळामार्फत बांधकाम कामगारांना लाभ वाटपात होत असलेल्या आर्थिक गैर प्रकाराची चौकशी करावी, संच वाटपामध्ये जाफराबाद व भोकरदन तालुक्यातील कामगारांना वगळण्यात का आले याची लेखी कारणासह सविस्तर माहिती देण्यात यावी, संच वाटप कॅम्प निकष काय आहेत, त्याची डिमांड कोणाकडे करावी लागते आणि मागील एक महिन्यापासून कॅम्प कोणामार्फत झाले, याची डिमांड सह तसे पत्र व त्याबद्दल सविस्तर माहिती देण्यात यावी, नोंदणी, नूतनीकरण व विविध योजना तपासणीसाठी व अर्ज निकाली काढण्यासाठी मंडळाचे किंवा इतर विभागाचे आपणास काय निर्देश आहेत. त्याचे लेखी पुरावे व स्पष्टीकरण देण्यात यावे, संच वाटप करण्यासाठी निवडलेल्या कंपनी बद्दल माहिती द्यावी, बांधकाम कामगारांना देण्यात येणाऱ्या सुविधा, इत्यादी बद्दल सविस्तर माहिती देण्यात यावी. नोंदणी व नूतनीकरणासाठी ग्रामसेवकांच्या प्रमाणपत्राची अट रद्द करून संबधित ठेकेदार किंवा नियोक्ताचे प्रमाणपत्र ग्राह्य धरावे आदी मागण्यासाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले.
धरणे आंदोलन संपन्न झाल्यानंतर बांधकाम कामगार संघटनेच्या शिष्टमंडळ जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयात गेले असता तेथे जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याने शेवटी कामगार अधिकारी यांच्या कॅबिनला निवेदन डकविण्यात आले. यावेळी जिल्हा कामगार अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. जिल्हा सरकारी कामगार अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे आर्थिक गैरव्यवहारामुळे खरे बांधकाम कामगार सरकारी लाभापासून वंचित राहत असल्याचा आरोप काॅ. गोविंद आर्दड यांनी करून यापुढे बांधकाम कामगारांच्या प्रश्नाकडे लक्ष न दिल्यास जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला.
या धरणे आंदोलनात विजय बोर्डे, सुनील हंगारगे, परमेश्वर मोहिते, दिगंबर वाघुंडे,नारायण मते आदींचा समावेश होता.