शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याकडून २५ लाखांची मागणी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा आरोप

मोर्शी/त्रिफुल ढेवले,दि.17
मोर्शी : राज्यात विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि शिवसेना एकत्र लढत आहेत. अशात महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये सातत वाद होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
यशोमती ठाकूर यांनी केलेल्या आरोपांमुळे महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत अमरावतीमधून मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेस आमदार आणि तिवसा मतदारसंघाच्या उमेदवार यशोमती ठाकूर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप केला आहे. यासह ठाकूर यांच्याकडे २५ लाख रुपयांची मागणीही करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. यशोमती ठाकूर यांच्या आरोपांमुळे महाविकास आघाडीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, यशोमती ठाकूर यांचे हे आरोप शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते सुनील वऱ्हाडे यांनी फेटाळून लावले आहेत.
काय म्हणाल्या यशोमती ठाकूर
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते सुनील वऱ्हाडे यांच्यावर आरोप करताना यशोमती ठाकूर म्हणाल्या, “यापूर्वी झालेल्या बँकेच्या निवडणुकीत आम्ही त्यांना निवडून आणले, त्यांनी पैशांची मदत मागितली ती सुद्धा केली होती. आता काल-परवा त्यांनी मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला आणि २५ लाख रुपयांची मागणी केली. ते व्यापारी प्रवृत्तीचे असल्याने सदैव ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत असतात.”
सुनील वऱ्हाडेंचे प्रत्युत्तर
माजी मंत्री आणि तिवसा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या उमेदवार यशोमती ठाकूर यांनी केलेल्या आरोपांवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते सुनील वऱ्हाडे यांनी पलटवार करत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. वऱ्हाडे म्हणाले, “मी माझ्या घरी बसलेलो आहे, पक्षाबरोबर कुठेच गडबड केली नसून, पक्षाशी निष्ठावंत आहे. आता त्यांनी चालवलेला हा चिल्लरपणा त्यांच्या फायद्याचा आहे की, तोट्याचा हे त्यांनीच ठरवायचे आहे.
तिवसा मतदारसंघ
अमरावती जिल्ह्यातील तिवसा मतदारसंघातून यशोमती ठाकूर यांनी २०१९ मध्ये सलग तिसऱ्यांदा सुमारे ११ हजार मतांनी विजय विजय मिळवला होता. यंदा यशोमती ठाकूर यांच्यासमोर महायुतीकडून भाजपाचे राजेश वानखेडे यांचे आव्हान असणार आहे. गेल्या वेळी ही जागा शिवसेनेकडे होती, तर आता इथून भाजपाचे उमेदवार मैदानात आहे. त्यामुळे यशोमती ठाकूर भाजपाचा सामना कसा करणार याबाबत मतदारसंघाच चर्चा सुरू आहे.
यंदा राज्याच्या विधानसभेसाठी २८८ मतदारसंघात २० नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर मजमोजणी २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. मतदान आता अवघ्या तीन दिवसांवर आल्याने राजभरात विधानसभा निवडणुकीचीच चर्चा सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.