मराठी भाषेला अभिजात दर्जा

मराठी भाषेला अभिजात दर्जा..
जालना, दि 19
महाराष्ट्र शासनाने मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्याने या भाषेच्या विकासाची वाट आणि त्यासाठी आवश्यक असणारा पैसा उपलब्ध होणार आहे. मात्र या वाटेवरून मराठी भाषिकांना प्रगती पथावर वाटचाल करून मराठी भाषा वापराला, लेखनाला आणि वाचण्याला कशी सोयीची होईल हे बघावे लागेल आणि मराठी भाषेच्या विकासासाठी सोपा आणि सुटसुटीत शब्दसंग्रह विशेषतः विज्ञान, तंत्रज्ञान, कायदा, शासकीय व्यवहार, तत्वज्ञान या विषयातील,विकसित करून त्याचा प्रसार आणि प्रचार सामान्य माणसापर्यंत करावा लागणार आहे. शासनाने सरकारी कामकाजाची शब्दावली तयार केलेली आहे पण ती वापरायला अतिशय अवघड आहे ती ग्रामीण साधारण शिकलेल्या व्यक्तीला समजणारी नाही. ती साधारणपणे इंग्रजी शब्दांचे भाषांतर किंवा अनुवाद असल्याने ती समजण्यास अवघड झाली आहे. ही शब्दावली जर एकदम नवीन पण समजायला सोपी केल्या गेली, जसे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अनेक सहज तोंडात बसणारे नवीन शब्द मराठीला दिलेले आहेत, तर ते वापरातही येतील आणि भाषा पण समृद्ध होईल.
इतर भाषेतील पुस्तके किंवा त्यात असलेली माहिती, ज्ञान जेंव्हा मराठीत आणण्याचा प्रयत्न अनुवादक करत असतो तेंव्हा ही योग्य शब्द शोधण्याची अडचण आणि तसे शब्द मराठी भाषेत यावेत याची जाणीव अनुवादकाला नेहमीच होत असते. पंक्चर याला चाकाचे छिद्रीकरण किंवा रेल्वे सिग्नल यास अग्निरथ आवक जावक सूचक असे अनुवाद बोजड ठरतात आणि वाचकाला ते वाचताना नैसर्गिक कंटाळा येतो.
भाषा आणि भाषिक याचे नाते साधारणपणे देव आणि भक्तासारखे असते. यांच्यात शक्ती आणि भक्ती याचा संबंध असतो. भक्ताच्या भक्तीतून, श्रद्धेतून त्या श्रद्धास्थानाची शक्ती वाढते तर श्रद्धास्थानाच्या संकटमोचनाच्या शक्तीमुळे भक्तांची भक्ती वाढते. आणि तसेच काहीतरी भाषा आणि भाषिकांचे आहे. भाषेचे सौष्ठव, त्याचा प्रभाव जितका जास्त तितकी भाषिकांची भक्ती जास्त आणि जितकी भाषिकांचा भाषेचा उपयोग जास्त तेवढी भाषेची शक्ती जास्त. आजतरी भाषेचा उपयोग कमी त्याचा प्रभाव कमी कारण दैनंदिन व्यवहारातील शब्द संपदा अविकसित आहे. ती शब्दसंपदा जर विकसित झाली आणि ती वापरला जर सोपी असली तर अभिजात दर्जा मिळाल्याचा मराठीवर प्रेम करणाऱ्या मराठी भाषिकांना खरा आनंद मिळेल.
भाषेचा उगमच मुळी आपल्या भावना, विचार याचे आकलन इतर व्यक्तींना व्हावे, आपले आणि त्यांचे विचार सारखे आहेत हे कळावे या साठी झाला. ही झाली बोली भाषा आणि लिखित भाषा त्या भावना, ते विचार अनेकांना कळावे म्हणून झाला.
मराठीच्या तुलनेत संस्कृत आणि हिंदी भाषा जास्त समृद्ध आहे तेंव्हा त्यातील शब्द जरी मराठीने आत्मसात केले किंवा तसेच पण सोपे शब्द निर्माण केले तर मराठी भाषेचा वापर वाढेल आणि मराठी भाषिकही वाढतील.
सर्व उद्योग, व्यवसाय, व्यापार, समाजकारण, राजकारण, शिक्षण, शासकीय कामकाज, स्वास्थ्यसेवा, वैद्यकशास्त्र, शल्यशास्त्र, तंत्रज्ञान, विज्ञान याला लागणारे सोपे प्रतिशब्द जर निर्माण करता आले आणि त्याचा प्रसार, प्रचार झाला तर अभिजात दर्जा मिळाल्याचा आनंद मराठी भाषिकांना नक्कीच मिळेल. त्यासाठी शुभेच्छा.
(विनय)कुमार देशपांडे,
व्यवस्थापन सल्लागार, जालना.
भ्रमण ध्वनी ९४२२२ १७८६८.