कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांचा २८ फेब्रुवारी रोजी संपूर्ण राज्यात लाक्षणिक बंद.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.14
महाराष्ट्र सरकारने वीज ऊद्योगातील कंत्राटी कामगारांची पगारवाढ व अन्य महत्वपूर्ण प्रलंबित प्रश्न लवकर सोडवावेत, भरतीमध्ये या कामगारांना प्राधान्य द्यावे, वयात सवलत व विशेष आरक्षण द्यावे या बाबतीत ऊर्जामंत्री व प्रशासनाने त्वरीत चर्चा करून कामगारांना न्याय द्यावा. अन्यथा दि. २८ व २९ फेब्रुवारी २०२४ रोजी संपूर्ण राज्यात लाक्षणिक काम बंद आंदोलन करण्याचा ईशारा महाराष्ट्र वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती २०२४ तर्फे कलेक्टर कार्यालय पुणे येथे लाक्षणिक निदर्शने करून देण्यात आला आहे.यावेळी पुणे जिल्हा, रायगड जिल्हा, कोकण विभाग, पश्चिम विभाग आदी विभागातील अधिकारी कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे
१ ) सर्व कंत्राटी कामगारांना ३० % वेतन वाढ देण्यात यावी.
२) रानडे समिती च्या शिफारशी त्वरित लागु करून कामगारांना एन एम आर माध्यमातून कायम नोकरीत समाविष्ट करावेत.
३) कायम करित नाही तोपर्यंत भ्रष्टाचार टाळण्यासाठी कंत्राटदार मुक्त रोजगार देण्यात यावा.
कलेक्टर कार्यालय पुणे येथे झालेल्या द्वारसभेच्या वेळी कृती समिती सदस्य व महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे अध्यक्ष निलेश खरात, राहूल बोडके, भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा अध्यक्ष अर्जुन चव्हाण , प्रादेशिक उपाध्यक्ष प्रवीण पवार,सहसंघटन मंत्री मार्गदीप म्हस्के , उमेश आणेराव, सागर पवार, सुमीत कांबळे, निखिल टेकवडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कृती समिती व्दारे निवेदन ज्योती कदम निवासी जिल्हाधिकारी पुणे यांना दिले आहे. शिष्टमंडळा मधील सदस्य अर्जुन चव्हाण, सुमीत कांबळे, निखिल टेकवडे,स्वाती शेलार , संगीता गंगावणे यांनी निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.सदरील निवेदन महाराष्ट्र राज्य सरकार कडे पाठविले जाईल असे आश्वासन निवासी जिल्हाधिकारी यांनी शिष्ट मंडळाच्या सदस्यांना दिले आहे.महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्हाधिकारी कार्यालय व तहसीलदार कार्यालय समोर आंदोलन करून निवेदन देण्यात आले आहे.अशी माहिती कृती समिती संघटक सचिन मेंगाळे यांनी दिली आहे.