महेंद्रशेठ मुरबा गणपती भक्तांसाठी देणार पॅसेंजर बोट, लाईफ जॅकेट!

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.16
महेंद्रशेठ घरत गणपतीचे निस्सीम भक्त आहेत. त्यांची गणपतीवर नितांत श्रद्धा आहे. त्यांनी संकष्टी चतुर्थीनिमित्त आज मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. तसेच मोरावे येथील समुद्रात असलेल्या मुरबा महागणपतीचे होडीने जाऊन दर्शन घेतले.
मोरावे येथील तरुणांनी समुद्रात गणपतीचे मंदिर बांधले आहे. सध्या हे मंदिर प्रसिद्ध झाले असून पनवेल, ठाणे, भिवंडी, मुरबाड, नवी मुंबईतून संकष्टी चतुर्थीला गणेश भक्तांची प्रचंड गर्दी होत आहे. समुद्रातील या गणेश मंदिरात प्रवासासाठी होडी हाच एकमेव पर्याय आहे. मोरावे येथील तरुण त्यांच्या इंजिनच्या होडीद्वारे भक्तांना ने-आण करतात, परंतु त्या होड्या छोट्या आहेत. गणेश दर्शन घेण्यासाठी प्रवास करताना अबालवृद्धांना, माय-लेकींना धोकादायक असल्याचे त्यांच्या लक्षात आले. मध्यंतरी एक होडी जरा कलंडली होती, साहजिकच भक्तांमध्ये भीती निर्माण झाली होती. महेंद्रशेठ यांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर तातडीने त्यांनी भक्तांसाठी लाईफ जॅकेट आणि पॅसेंजर बोट देण्याचा शब्द दिला.
संकष्टी चतुर्थीनिमित्त महेंद्रशेठ यांनी आज मुरबा महागणपतीचे दर्शन घेतल्यानंतर भक्तांच्या सोयीसाठी तातडीने त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी (ता. २९) मुरबा महागणपती मंदिराचा वर्धापन दिन आहे. त्यावेळी गणेशभक्तांसाठी लाईफ जॅकेट आणि सुरक्षित प्रवासासाठी पॅसेंजर बोटीचे लोकार्पण करण्यात येणार आहे.
त्यामुळे गणेश भक्तांचा प्रवास सुखकर होईल. संकष्टी चतुर्थीनिमित्त महेंद्रशेठ यांनी भक्तांच्या आनंदाचा विचार केल्याने गणेशभक्तांनी आणि व्यवस्थापनातर्फे आभार मानण्यात आले.