शेतकऱ्यांना 30 सप्टेंबरपर्यंत खरीप पीक कर्ज वाटप पीक कर्जाचे नुतनीकरण 30 जुनपूर्वी करण्याचे आवाहन
जालना/प्रतिनिधी,दि. 21
जालना जिल्हयातील सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की, जालना जिल्हयातील राष्ट्रीयकृत, ग्रामीण, व्यापारी व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत दिनांक दि. 1 एप्रिल 2024 ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीत खरीप पीक कर्ज वाटप करण्यात येत आहे.
जिल्हयातील विविध बँकांच्या वतीने शेतकऱ्यांना दरवर्षी पीक कर्जाचे वितरण केले जाते. या अल्पमुद्दत पीक कर्जाची परतफेड मुदतीत म्हणजेच कर्ज घेतल्यापासून 365 दिवस किंवा 30 जूनपूर्वी करावी लागते. या मुदतीत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना नवीन वर्षासाठी पुन्हा कर्ज दिले जाते. मुदतीत कर्जाची परतफेड न केल्यास कर्जखाते थकीत होते. अशा थकीत खातेदारांना बँका पीक कर्ज देत नाहीत, त्यामुळे शेतक-यांच्या अडचणी वाढतात. कर्जखात्याचे नुतनीकरण करुन घेतल्यास नवीन पीक कर्जाच्या दरानुसार वाढीव कर्ज घेण्यास शेतकरी पात्र होतात. कर्जाचे नुतनीकरण केलेल्या शेतकऱ्यांना बँकांच्या इतर कर्जयोजनांचादेखील लाभ घेता येतो. त्यात कृषि वाहन योजना, शेतकी तारण योजना, फळबाग, फुलबाग, हरितगृह, शेडनेट योजना, शेळीपालन, पशुपालन, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, कृषि यांत्रीकीकरण, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रीया योजनांचा लाभ शेतकऱ्यांना घेता येतो. तसेच पीक कर्जाची नियमित मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत रुपये 3.00 लाखापर्यंतच्या कर्जावरील व्याजात 3 % सवलत व केंद्र शासनाकडून व्याजात 3 % सवलत व्याज परतावा सवलत मिळते त्यामुळे शून्य टक्के व्याज दराने पीक कर्ज उपलब्ध होते. तसेच शासनाने पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत रुपये 50 हजारपर्यंत प्रोत्साहनपर कर्जमाफीचा लाभ दिलेला आहे. तसेच कर्जाची नियमित परतफेड केल्यास सदर खाते एनपीएमध्ये न जाता खातेदाराचा सिबील रेकॉर्ड चांगले रहाते, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बचत खात्यावर जमा होणाऱ्या रकमा काढण्यावर बँकेकडून निर्बंध लावले जात नाहीत. या सर्व सवलतींचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांचेकडील पीक कर्जाची परतफेड नियमितपणे करणेबाबत तसेच पीक कर्जाचे नुतनीकरण दि. 30 जून 2024 पूर्वी करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था परमेश्वर वरखडे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रेषित मोघे यांनी केले आहे.
दिनांक 1 एप्रिल 2024 ते 20 जून 2024 या कालावधीत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. जालनाने खरीप पीक कर्जवाटपाचा लक्षांक 150 कोटींपैकी 40,750 सभासदांना 107 कोटी (72 %) इतके खरीप पीक कर्जवाटप केले आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेने खरीप पीक कर्जवाटपाचा लक्षांक 230 कोटींपैकी 13,926 सभासदांना 136 कोटी (59%) इतके तसेच राष्ट्रीयीकृत/व्यापारी बँकांनी खरीप पीक कर्जवाटपाचा लक्षांक 928 कोटींपैकी 8,836 सभासदांना 125 कोटी (14%) इतके खरीप पीक कर्जवाटप केले आहे. जिल्हयाचा खरीप पीक कर्जवाटपाचा लक्षांक 1,308 कोटी असून त्यापैकी 63, 512 शेतकऱ्यांना 369 कोटी (28%) खरीप पीक कर्जवाटप केले आहे, असे श्री. वरखडे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.