निराधार योजना लाभार्थ्यांच्या खात्यात थेट डीबीटीमार्फत जमा होणार अनुदान 10 जुलैपर्यंत आवश्यक कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन
लाभार्थ्यांनो, आपले अपडेट आधार, बँकेत आधार लिंक असलेले खाते, मोबाईल क्रमांक जमा केला का? नसेल केला तर तलाठी/कोतवाल यांच्याकडे तात्काळ माहिती द्यावी
जालना/प्रतिनिधी,दि.26
शासनाच्या विशेष सहाय्य कार्यक्रमातAर्गत राबविण्यात येणाऱ्या राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना अंतर्गत लाभार्थ्यांना दरमहा वितरीत करावयाचे मानधन तहसिल कार्यालयातील संजय गांधी योजना विभागामार्फत बँकेला पाठवून संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग केले जात होते. मात्र आता शासनामार्फत सदर अर्थसहाय्याचे वितरण हे डी.बी.टी. पोर्टलच्या माध्यमातुन निराधारांच्या थेट खात्यात वर्ग केले जाणार आहे. त्यामुळे वयोवृध्द लाभार्थ्यांना अनुदानासाठी बँकात खेटे घालावे लागणार नाही. आता डी.बी.टी. पोर्टलद्वारे निराधारांचे अनुदान थेट बॅंक खात्यात मिळणार असल्याने निराधारांची हेळसांड थांबुन बँक कर्मचाऱ्यांची कसरत थांबणार आहे.
त्यासाठी या दोन्ही योजनांचा लाभ घेत असलेल्या पात्र निराधारांकडून खालील दिलेल्या कागदपत्रे संकलित करण्याची प्रक्रिया जिल्ह्यातील सर्व 8 तालुक्यांतील संजय गांधी योजना विभागांकडून सुरु करण्यात आलेली आहे. याबाबत गावस्तरावरुन तलाठ्यांना आवश्यक त्या सूचना देऊन संबंधितांना कळविले जात आहे.
सर्व राज्य पुरस्कृत योजनेच्या लाभार्थी यांनी दि. 10 जुलै 2024 पर्यंत खालील कागदपत्रे जमा करावेत. यासाठी लाभार्थी यांनी स्वत: तहसिल कार्यालयात उपस्थित राहणे आवश्यक नाही त्यामुळे स्वत: लाभार्थी यांनी तहसिल कार्यालयात येवून गर्दी न करता आपले गावातील तलाठी/कोतवाल यांचेमार्फत किंवा घरातील इतर सदस्यांमार्फत कागदपत्रे जमा करावीत.
पुढील कागदपत्रे जमा करणे आवश्यक आहे – अद्यावत आधारकार्ड (ई-आधार), हयात असलेले प्रमाणपत्र, बँकेचे पासबुक, मोबाईल क्रमांक, दिव्यांग प्रमाणपत्र (असल्यास), मृत्यू प्रमाणपत्र (विधवा लाभार्थ्यांसाठी), परित्यक्त्या/घटस्फोटीत/दुर्धर आजाराचे प्रमाणपत्र. सदरील कागदपत्रे मुदतीत जमा करावे जेणेकरुन डी.बी.टी. पोर्टलद्वारे आपणांस नियमीत अनुदान वितरण करण्यात येईल. अधिक माहितीकरीता संबंधीत तहसिलदार/नायब तहसिलदार संगायो यांचेशी संपर्क करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.