pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

उरण तालुक्यातील जासई, दिघोडे चिरनेर आदी तीनही ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच ; भाजपचा सफाया

0 1 1 8 1 4

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.6

रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील जासई, दिघोडे चिरनेर आदी तीनही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत महाआघाडीने भाजपला चितपट केले आहे.तीनही ग्रामपंचायतींमध्ये थेट सरपंचापदासह सदस्यांचाही बहुमताचा आकडा पार करून निर्विवाद सत्ता काबीज केली आहे.उरण तालुक्यातील चिरनेर ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत महाआघाडी विरोधात भाजप असा सामना रंगला होता.सरपंचासह 17 जागांसाठी पाच प्रभागातुन 30 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात होते.

प्रभाग क्रमांक 4 मधुन महाआघाडीच्या भारती मनोज ठाकूर या याआधीच बिनविरोध निवडून आल्याने महाआघाडीला शुभशकुन मिळाला होता.भाजपच्याच धनदांडग्यांनी केलेल्या अनधिकृत बांधकामांमुळेच मागील काही वर्षांपासून ऐतिहासिक चिरनेर गावाला पावसाळ्यात सातत्याने पुराचा सामना करावा लागत आहे.निवडणूकीच्या प्रचारात प्रमुख मुद्दा बनला होता. याच मुद्यानी भाजपची नौका मतदारांनी अरबी समुद्रात बुडविली. निवडणूकीच्या प्रचारात भाजपच्या महेश बालदी, प्रशांत ठाकूर या दोन्ही आमदारांनीही जाहीर सभा घेऊन मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला होता.

मात्र महाआघाडीचे सरपंचपदाचे उमेदवार भास्कर मोकल यांनी 3128 मतांचा आकडा पार करून भाजपचे नवखे उमेदवार प्रतिक गोंधळी यांना 1904 मतांनी पराभूत केले.प्रतिक गोंधळी यांना 1224 मतांवर समाधान मानावे लागले.तर सदस्यपदाच्या 15 पैकी 14 जागा
जिंकून ग्रामपंचायतीवरही निर्विवादपणे सत्ताही काबीज केली आहे.

दिघोडे ग्रामपंचायतीत सत्ताधारी भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मनसे महायुती विरोधात
कॉंग्रेस, शेकाप आघाडी अशीच लढत झाली.मागील निवडणुकीत ग्रामपंचायतीवर भाजपने शिवसेना शेकापला हाताशी धरून सत्ता स्थापन केली होती.मात्र निवडणुकीत दिलेल्या एकाही आश्वासनाची पुर्तता भाजपच्या सत्ताधाऱ्यांना केलेली नाही.याचाच फायदा उठवत या अगोदर मागचा टर्म वगळता कित्येक वर्षे काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या दिघोडे ग्रामपंचायतीवर कॉंग्रेस – शेकाप आघाडीचे सरपंच पदाचे उमेदवार किर्तीनिधी ठाकूर यांनी 1237 मते मिळवून भाजपचे मयुर घरत यांचा 444 मताधिक्याने पराभव केला आहे.पराजित भाजपा उमेदवार
मयूर घरत यांना 793 मते मिळाली आहेत.
काँग्रेस महाआघाडीचे 9 पैकी 9 सदस्य निवडून आल्याने ग्रामपंचायतीवरही महाआघाडीने वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

लोकनेते दिवंगत दिबांचे जन्मगाव असलेल्या जासई ग्रामपंचायतींमध्ये सर्वपक्षीय इंडिया महाआघाडी विरोधात भाजप अशी सरळ लढत झाली.सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीची थेट सरपंच आणि 17 अशी 18 सदस्य संख्या आहे.यामधुन इंडिया महाआघाडीच्या सृष्टी म्हात्रे यांची याआधीच बिनविरोध निवड झाली आहे.त्यामुळे सरपंच व उर्वरित 16 सदस्यपदासाठी निवडणूक झाली. सर्वपक्षीय इंडिया महाआघाडीचे 17 पैकी 12 सदस्य निवडून आले आहेत.

तर सरपंचपदी इंडिया महाआघाडीचे संतोष घरत यांनी 1925 मते मिळवून भाजपचे बळीराम घरत यांचा 152 मतांनी मतांनी पराभव केला आहे. पराभूत उमेदवार बळीराम घरत यांना 1773 मतांवर थांबावे लागले आहे.
निवडणूकीत विजयी मिळवण्यासाठी ग्रामपंचायतींमध्ये विविध राजकीय पक्षांच्या प्रचार रॅली,सभा घरोघरी जाऊन प्रचाराचा धुरळा उडविला होता.मतदारांना विविध आमिषे दाखवून आकर्षित करण्यासाठी आटोकाट प्रयत्नही केले होते.मात्र सुजाण, सुशिक्षित मतदारांनी मतदानाचा कौल भाजप विरोधात दिला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 8 1 4