अवैध रेतीचे उत्खनन न थांबता थांबेना

मोर्शी/त्रिफुल ढेवले,दि.2
मोर्शी : मोर्शी तालुक्यातील रेती तस्करी प्रकाशझोतात आल्यानंतर महसूल यंत्रणा ‘अॅक्शन मोड’वर आली. काही दिवसांपूर्वी त्यांनी अवैध रेती उत्खनन करणाèयांवर कारवाई करून मोठा गाजावाजा केला. मात्र तालुक्यात आता दिवस-रात्र खुलेआम होत असलेल्या रेती तस्करीला महसूल विभागाने खुली सूट दिल्याचे दिसत आहे.अहोरात्र तस्करांचा धुमाकूळ सुरूच आहे. मात्र, तहसील प्रशासन झोपेचे सोंग घेऊन असल्याने रेती तस्कर भररात्र ट्रॅक्टर ने रेती तस्करी करत आहेत. मोर्शी तालुक्यात दलपतपुर घाटातून अहोरात्र रेती उपसा नदीपात्रातून होत आहे. रेतीघाटांचे लिलाव झालेले नसतानाही वर्धा नदीपात्र पोखरून मोठ्या प्रमाणात रेतीचोरी होत आहे. त्यामुळे शासकीय कर्मचारी या चोरांच्या वेसणीला बांधलेले आहेत असा निष्कर्ष नागरिक काढत आहेत. तालुक्यासह दलपतपुर परिसरात मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर द्वारे अवैध वाळू वाहतूक सुरू आहे. परिणामी, स्थानिक रस्त्याची दैना झाली आहे. वर्धा नदी वाळूची चोरी करत रस्त्याने अवजड वाहनांची वर्दळ राहत असल्याने रस्ते खराब झाले आहेत.तालुक्यात सध्या मोठमोठे शासकीय बांधकाम सुरू आहे. या बांधकामाला नियमितपणे रेतीचा पुरवठा आहे. कित्येक गरिबांचे घरकुल रेतीअभावी रखडले आहेत. धनदांडग्यांना हवी तेव्हा रेती मिळत असून आणि गरिबांना मात्र वंचित राहावे लागत आहे.शासनाने घरकुलांसाठी 5 ब्रास रेती रॉयल्टी मोफत देणार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे घरकुलवाल्या गरिबांच्या आशा पल्लवित झाल्या. मात्र शासनाचा तो आदेश फक्त कागदावरच असल्याचा दिसून येत आहे.गरिबांच्या घरकुलासाठी फुकटची तर दूरच, विकतचीसुद्धा रेती मिळेनाशी झाली आहे. 5 ब्रास रेतीसाठी तब्बल 30 हजार रुपये रुपये मोजावे लागत असल्याचे भयावह चित्र तालुक्यात आहे. शीवरा रस्त्यावरून दररोज रात्री ट्रॅक्टर द्वारे अवैध रेती वाहतूक होते. त्यावेळी महसूल विभाग झोपलेला असतो व जागा राहणारा पोलिस विभाग चोरांवरची नजर सोडून रेतीवर खिळवून ठेवतो. आर्थिक नजराणा मिळाला की, तुमचे तुम्ही चालू द्या असा प्रकार सध्या तालुक्यात खुलेआम सुरू आहे.महसूलच्या आशीर्वादाने मोर्शी तालुक्यात तस्कर गब्बर होताना दिसत आहेत. त्यांना छुपा आशीर्वाद देणारे महसूल व पोलिस प्रशासन स्वतःला मालामाल करून घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे.