pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

युईएस शाळेच्या मनमानी व बेकायदेशीर कारभारा विरोधात पालकांचे पंचायत समितीवर मोर्चा.

सततच्या अतिरिक्त फी वाढीने यु.ई.एस शाळेचे पालक त्रस्त.पालकांना नेहमी विश्वास न घेता शाळा प्रशासन विविध निर्णय घेत असल्याचा पालकांचा शाळा प्रशासनावर आरोप.

0 1 7 4 0 8

उरण/ विठ्ठल ममताबादे,दि.16

उरण तालुक्यातील यू.ई एस शाळा नेहमी वादाच्या भोवऱ्यात असते. आता या शाळेतील ओळखपत्राचा विषय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. विद्यार्थी पालकांना (आई, वडिलांना) विश्वासात न घेता प्रत्येक विदयार्थ्याला शाळा प्रशासनाने ओळखपत्राचे 550 फी लावली आहे. शिवाय डायरीचे 100 रुपये लावले आहे.ओळखपत्रचे फी भरल्याची रीतसर पावती सुद्धा पालकांना दिली जात नाही. पालकांनी या गोष्टीस जोरदारपणे विरोध केला आहे. ओळखपत्राचे 550 रुपये व डायरीचे 100 रुपये एकूण 650 रुपये गरीब सर्वसामान्य माणूस कसा भरणार ? शिवाय हे ओळखपत्राचे व डायरीचे पैसे (फी ) दरवर्षी शाळेत भरायचे आहे. एका विद्यार्थ्याला ओळखपत्र व डायरीचे 650 रुपये भरावे लागणार आहे. एखादया व्यक्तीला 3 मूले असतील त्या व्यक्तीला मूलांचे 1950 रूपये दरवर्षी शाळेत भरावे लागणार आहे.ओळखपत्रचे पैसे भरल्याची पावती सुद्धा पालकांना मिळत नाही. दरवर्षी प्रत्येक विदयार्थ्याला ही ओळखपत्र व डायरीचे फी भरणे परवडणारे नाही.या शाळेत रिक्षा चालकांचे, मजूरांचे, गोरगरिब कामगांराचे मूले शिक्षण घेत आहेत.अत्यल्प उत्पन्न असल्या कारणाने त्यांनाही ही फी भरणे परवडणारे नाही. त्यामुळे यू.ई.एस प्रशासनावर कठोर अशी कारवाई करण्यात यावी अशी मागणी पालक शिक्षक संघटनेने पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहाराद्वारे केली आहे. तसेच पालकांशी उद्धटपणे वागणाऱ्या प्राचार्य सिमरन दहिया यांना निलंबित करण्याचिही मागणी पालकांनी केली आहे.यापूर्वी शाळा प्रशासनाने दहावीच्या विदयार्थ्यांना शाळेची फि भरली नाही म्हणून 10 ते 15 विद्यार्थ्यांना शाळेच्या बाहेर बसवून त्यांचा अपमान केला होता. तर काही महिन्यापूर्वी मृत पावलेल्या विदयार्थ्यांच्या पालकांना विद्यार्थी मृत असतानाही फि भरावे अशी नोटिस मृत विदयार्थ्यांच्या वडिलांना पाठविली होती. मुलगी मृत असताना देखील फी भरण्याची नोटीस त्या मृत विद्यार्थिनीच्या वडिलांना मिळाल्याने तेही नाराज झाले होते. या प्रकरणावेळी पालकामध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. आता तर ओळखपत्राचे 550 व डायरीचे 100 रूपये भरण्याचे पालकांना सक्तीचे केल्याने पालकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. घडलेल्या घटने संदर्भात सर्व पालकांनी एकत्र येत दि 14 ऑगस्ट 2023 रोजी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समीर वठारकर यांची भेट घेऊन मनमानी व बेकायदेशीर कारभार करणाऱ्या यू.ई.एस शाळा प्रशासनावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील उरण न्यायलया समोर असलेली यू.ई.एस ही शाळा कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमी वादात राहत असते. सातत्याने फी मध्ये वाढ केली जाते. सत्र फी, परीक्षा फी व इतर फी वेळोवेळी घेतल्या जातात. पालक हे फी सुद्धा भरतात मात्र दरवेळी नवनवीन कारणे सांगून वेगवेगळे फी भरण्यास सांगितले जाते. पालकांवर दबाव आणला जातो. त्यामुळे या यू.ई. एस शाळेच्या व्यवस्थापना विरोधात व मनमानी, बेकायदेशीर कारभाराविरोधात उरण मधील पालकांनी अनेकवेळा आवाज उठविला आहे.परंतु पालकांच्या वेगवेगळ्या समस्यांची विद्यार्थ्यांच्या समस्यांची कोणीच दखल घेत नसल्याने पालक वर्गामध्ये नाराजी पसरली आहे. यू.ईएस प्रशासनाच्या गलथान,बेकायदेशीर व भोंगळ कारभारा विरोधात महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागात अनेकवेळा पत्रव्यवहार करूनही शासनाचे पदाधिकारी , कर्मचारी यू.ई.एस प्रशासनावर कोणतीही कायदेशीर कारवाई करीत नाही. आजपर्यंत अनेक समस्यांबाबत पालकांनी, पालक शिक्षक संघटनेने वेळोवेळी आवाज उठविला पण प्रशासनाने आजपर्यंत शाळा प्रशासनावर कोणतीही कारवाई केलेली नाही. विद्याथी पालकांच्या समस्या सोडविण्याऐवजी शाळेला पाठीशी घालण्याचे काम महाराष्ट्र शासनाचे शिक्षण विभागाचे अधिकारी , कर्मचारी वर्ग करीत असल्याने विदयार्थ्याचे भविष्य अंधारात असल्याचे पालक शिक्षक संघटनेच्या माजी उपाध्यक्षा ॲड. प्राजक्ता योगेश गांगण यांनी सांगितले.

——————————————————–

शिक्षकांना शासन नियमानुसार वेतन मिळत नाही.शिक्षकांना ठरलेल्या पगारापेक्षा कमी पगार शाळा प्रशासनाकडुन दिला जातो.त्यामूळे शिक्षकांना प्रायव्हेट ट्यूशन घ्यावे लागते. शिक्षक विद्यार्थ्यांना क्लासमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी दबाव टाकत असतात.त्यामुळे याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे. त्यामूळे हा प्रश्न लवकरात लवकर सोडविला गेला पाहिजे
– अक्षता कोशे
पालक प्रतिनिधी. शिक्षक पालक संघ.

ओळखपत्रासाठी 550 रुपये व डायरी साठी 100 रुपये भरणे हे पालकांना मान्य नाही. या संदर्भात माझ्याकडे पालकांच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत या गोष्टीला पालकांचा विरोध आहे. ही बाब शाळा प्रशासनास वेळोवेळी पत्र व्यवहार करून देखील निदर्शनास आणून दिली. मात्र या शाळा प्रशासनाने या बाबीकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले आहे. 550 रुपये फी गोरगरिबांना परवडत नाही. ही अतिरिक्त फी अवाजवी स्वरुपाची आहे, तसेच ओळखपत्रसाठी 550 रुपये भरलेल्या पालकांना पैसे भरल्याची रीतसर पावती दिली जात नाही.या संदर्भात शाळा व्यवस्थापन समिती कोणतेही समाधानकारक उत्तर देत नाही. सदर बाब ही शिक्षण हक्क कायद्याचे उल्लंघन करणारी आहे.
– अँड. प्रतिभा भालेराव.
उपाध्यक्ष. पालक शिक्षक संघटना

आम्ही कोणत्याही विद्यार्थी किंवा पालकांवर अन्याय केलेला नाही. जे काही निर्णय घेतो ते सर्व शासनाच्या मार्गदर्शक तत्वे व नियमानुसारच घेतो. हल्ली विद्यार्थी हरविण्याच्या तसेच मुलांना पळवून नेण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. विद्यार्थ्यांचे आई वडील दोघेही कामावर असतात. म्हणून सुरक्षिततेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना ओळखपत्रामध्ये एक चिप देण्यात आलेली आहे. 550 रुपये हे त्या चिपचे आहेत. विद्यार्थी कोठेही असला तरी त्याचे लोकेशन समजण्यासाठी हे चिप बसविले आहे.या चिप मूळे विद्यार्थी शाळेत आला की नाही याचा मेसेज पालकांना घरबसल्या मोबाईलवर मिळतो. ही अत्याधुनिक यंत्रणा असल्याने ही खर्चिक बाब आहे. विदयार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना ओळखपत्र देण्यात आलेले आहेत. व त्या ओळखपत्रात चिप बसविण्यात आला आहे. कोणतेही अवाजवी फी आकारण्यात आलेली नाही.शाळेची बदनामी करण्याच्या पाठीमागे काही राजकीय संघटना कार्यरत आहेत. शाळा व्यवस्थापनाचे कामकाज नियमानुसार सुरु आहे.
– तनसुख जैन
अध्यक्ष – यू.ई.एस. शाळा व्यवस्थापत समिती.

यू. ई. एस शाळेचे पालकांनी माझी भेट घेतली. त्यांनी आपल्या विविध समस्या माझ्या समोर मांडलेल्या आहेत. घडलेल्या घटनेची त्वरीत चौकशी करण्यात यावे. सर्व सबळ पुरावे जमा करून ते पंचायत समिती कार्यालयमध्ये जमा करावे असा आदेश गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात आलेला आहे. जर सबळ पुराव्या वरून शाळा प्रशासन दोषी आढल्यास शाळा प्रशासनावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.
– समीर वठारकर, गटविकास अधिकारी पंचायत समिती उरण.

युईएस शाळेच्या विद्यार्थी ओळखपत्र संदर्भात पालकांनी पंचायत समिती मध्ये केलेला अर्ज मला प्राप्त झालेला आहे.पालकांच्या समस्या लक्षात घेउन यु.ई. एस शाळा प्रशासना सोबत झालेले पत्रव्यवहार व इतर बाबी तपासून, योग्य ती चौकशी करूनच पुढील निर्णय घेतला जाईल.
-प्रियांका पाटील
गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती उरण

———————————————————–

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे