मोर्शी चांदुर बाजार मार्गावर भीषण अपघात

मोर्शी/त्रिफुल ढेवले,दि.14
मोर्शी : चांदूर बाजारवरून मोर्शीकडे जाणाऱ्या भरधाव कारची रेल्वे गेटजवळ उभ्या असलेल्या ट्रकला धडक बसली. या अपघातात तिघे गंभीर जखमी झाले असून, एक किरकोळ जखमी आहे. जखमींमध्ये दोन युवक व दोन युवतींचा समावेश आहे. ही घटना शुक्रवार दि.13 रात्री साडेनऊ वाजता मोर्शी चांदूर बाजार मार्गावरील खेड फाट्याजवळ घडली.
आदेश खडसे २५, रा. दुर्गवाडा, ता. मोर्शी व आकाश खराडे २८, रा. मोर्शी अशी अपघातातील जखमी युवकांची नावे आहेत. घटनेच्या वेळी नरखेडकडे जाणारी काचीगुडा एक्स्प्रेस येत असल्याने तालुक्यातील खेड फाटा नजीक असलेले रेल्वे गेट बंद करण्यात आले होते. त्यामुळे चांदूर बाजारकडून मोर्शीकडे जात असलेला ट्रक एमएच २७ एक्स ४५८५ रेल्वे गेटजवळ उभा होता. त्याच वेळी मागून येणारी भरधाव कार एमएच ३१ सीए ३७२९ उभ्या असलेल्या ट्रकला धडकली. यामध्ये असलेले दोन युवक व दोन युवती जखमी झाले. घटनेची माहिती उदखेड येथील काही नागरिकांना मिळताच त्यांनी लगेच घटनास्थळावर धाव घेऊन जखमींना मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालय दाखल करण्यात आले. जखमीची परिस्थिती गंभीर असल्याने तेथील डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी अमरावती जिल्हा रुग्णालयात पाठवले. पुढील तपास मोर्शी पोलिस करत आहेत. वृत्त लिहिस्तोवर जखमी युवतींची नावे कळू शकली नाही.