अमृत पेठ-2026’ उद्योजक मेळाव्याचे आयोजन
जालना/प्रतिनिधी,दि. 27
स्थानिक कारागिरांच्या कौशल्याला दाद देण्यासाठी आणि स्वदेशी उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृतकडून जालन्यात ‘अमृत पेठ 2026’ या भव्य उद्योजक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 11 आणि 12 एप्रिल 2026 रोजी महेश भवन, गुरु बच्चन चौक, मंठा चौफुली, जालना येथे थेट उत्पादकांकडून दर्जेदार वस्तू खरेदी करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
स्वदेशी वस्तूंच्या वापराला चालना देणे हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र शासनाच्या अमृत संस्थेने हे पाऊल उचलले आहे. या मेळाव्यात स्थानिक उद्योजक, महिला बचत गट तसेच नवउद्योजकांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांचे स्टॉल थाटले जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने घरगुती उत्पादने, आकर्षक हस्तकला वस्तू, खमंग खाद्यपदार्थ, तयार कपडे आणि दैनंदिन वापराच्या वैविध्यपूर्ण वस्तूंचा समावेश असेल. स्वदेशी बाजारपेठ या संकल्पनेवर आधारित हा मेळावा सर्वांसाठी खुला असून, जालनाकरांनी आपल्या कुटुंबीय आणि मित्रपरिवारासह या उपक्रमाला भेट द्यावी. स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन देऊन स्वदेशीचा संकल्प अधिक दृढ करावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी नागरिकांनी ७३९१०६५४७४ किंवा ९४२१९४४७५२ या क्रमांकावर संपर्क साधावा. असे जिल्हा व्यवस्थापक, अमृत कार्यालय, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.



