आवरे येथे नवीन शिक्षकमित्र बाळासाहेब म्हात्रे कॉलेजचा प्रवेशोत्सव सुरु.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.19
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने दि. १५ जुलै २०२४ च्या शासन निर्णयाद्वारे ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेस मु.-आवरे, ता.-उरण, जि.-रायगड येथे शिक्षकमित्र बाळासाहेब म्हात्रे कॉलेज ऑफ आर्टस्, सायन्स अँड कॉमर्स या नावाने नवीन महाविद्यालय सुरु करण्यास अंतिम मान्यता प्रदान करण्यात आली आहे. उरण तालुक्यामधील ग्रामीण भागातील हे पहिले महाविद्यालय असून यामध्ये बॅचलर ऑफ आर्ट्स, बॅचलर ऑफ कॉमर्स, बॅचलर ऑफ सायन्स आणि बॅचलर ऑफ सायन्स (आय.टी.) या चार विद्याशाखांतून पदवीपर्यंतचे शिक्षण घेण्याची सुविधा विद्यार्थ्यांना प्राप्त झाली आहे.
या महाविद्यालयाच्या प्रवेशोत्सवाचा शुभारंभ नुकताच संस्थेच्या अध्यक्ष पुष्पलता बाळासाहेब म्हात्रे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आला. यावेळी संस्थेच्या खजिनदार प्राचार्य डॉ. सुखदा चिराटे, विश्वस्त प्राचार्य राजेंद्र म्हात्रे, विश्वस्त मेघा म्हात्रे, रामचंद्र म्हात्रे विद्यालय अँड ज्युनि. कॉलेजचे प्राचार्य सुभाष ठाकूर, माजी वन विभाग अधिकारी महादेव गावंड आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ‘वारी – शिक्षणाची, प्रवेशोत्सव – पदवीचा’ या संकल्पनेवर आधारित दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये संस्थेतील विद्यार्थी, शिक्षक, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आवरे गावचे सुपुत्र व संस्थेचे संस्थापक शिक्षकमित्र प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे यांच्या नावाने ग्रामीण भागात सुरु झालेल्या आणि प्रशस्त इमारत व सर्व सोयी – सुविधांनी युक्त असणाऱ्या या महाविद्यालयामध्ये गरीब, कष्टकरी व शेतकरी कुटुंबातील होतकरू विद्यार्थ्यांना पदवी शिक्षणाची संधी उपलब्ध होणार असून त्याचा जास्तीत जास्त युवक – युवतींनी या महाविद्यालयात प्रवेश घेऊन लाभ घ्यावा, असे आवाहन विश्वस्त प्राचार्य राजेंद्र म्हात्रे यांनी केले आहे आणि महाविद्यालयास मंजुरी मिळण्यासाठी झटणाऱ्या सर्व समाजघटकांचे त्यांनी आभार मानले आहेत.