जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी कठोर मेहनत करणे
अत्यंत गरजेचे आहे. मेहनत केल्यास यश हे हमखास मिळते. तुमच्या तारुण्याच्या या काळात चांगल्या मित्रांची संगत ही सुद्धा खूप महत्वाची आहे, असे संस्थेचे अध्यक्ष तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे
जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर म्हणाले.
जालना शहरात संभाजीनगर प्रभागात असलेल्या शांतिनिकेतन विद्यामंदिर या शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देताना संस्थेचे अध्यक्ष तथा
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, जीवनात यशस्वी होऊन केवळ पैसा
मिळवणे हाच हेतू न ठेवता समाजाची सेवा करणे अत्यंत गरजेचे आहे. यातूनच चांगला व्यक्ती म्हणून तुमचे नाव लौकिक होईल व त्यातून तुमचे आई-वडिल,
शाळा व गुरुजन यांचे नाव मोठे होईल. अनेक यशस्वी झालेले विद्यार्थी भेटतात तेव्हा त्यांचा आम्हाला खूप अभिमान वाटतो. या स्पर्धेच्या युगात
कधी कधी जीवनात अपयश वाटयाला येते तेंव्हा खचून निराश होऊ नका तर त्यातून नवीन संधी शोधण्याचा प्रयत्न करा. असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना
भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी व्यासपीठावर शहरप्रमुख बाला परदेशी, घनश्याम खाकीवाले, दीपक रणनवरे, माजी नगरसेवक विजय पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. निरोप
समारंभाचे या कार्यक्रमात अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंबादास घायाळ
यांनी केले. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रेमला पंडित, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर गाढवे, शिक्षक
अंबादास घायाळ, संदीप वाखरकर, सीमा इंगळे, कांचन वाघ, शिवहरी मांटे,कीर्ती खैरे, अरुणा मांटे, सुमित्रा शर्मा, वसंत गाडेकर, तुकाराम चव्हाण
आदींनी प्रयत्न केले.