रिद्धपूरचा गौरव:श्री चक्रधर स्वामींचा अवतारदिन राज्य शासन साजरा करणार, महानुभाव पंथाकडून निर्णयाचे स्वागत

मोर्शी/त्रिफुल ढेवले,दि 1
महानुभाव पंथाचे प्रवर्तक भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांचा अवतारदिन राज्य शासन आता अधिकृतपणे साजरा करणार आहे. भाद्रपद शुक्ल द्वितीयेला यंदा २५ ऑगस्ट रोजी हा दिवस ‘अवतार दिन’ म्हणून साजरा केला जाईल. सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचे परिपत्रक बुधवारी जारी केले.श्रीचक्रधर स्वामींचे पावन स्थळ असलेल्या मोर्शी तालुक्यातील रिद्धपूर येथे यापूर्वीच देशातील पहिले मराठी विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे. राज्याचे महसूल मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निर्णयाची पुष्टी केली आहे.१२ व्या शतकात श्रीचक्रधर स्वामींनी सत्य, अहिंसा, मानवता आणि समानता ही मूल्ये समाजाला दिली. अवतार दिनी आयोजित करावयाच्या कार्यक्रमांबाबत स्वतंत्र सूचना नंतर जारी केल्या जाणार आहेत.या निर्णयासाठी कवीश्वर कुलाचार्य महंत श्री कारंजेकरबाबा यांच्या नेतृत्वाखाली महानुभाव शिष्टमंडळाने २२ मार्चला नाशिक येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बैठक घेतली होती. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार हे परिपत्रक जारी करण्यात आले.या निर्णयामुळे आता दरवर्षी मुंबई मंत्रालय आणि दिल्लीतील महाराष्ट्र सदनात अवतारदिन साजरा केला जाईल. देशपातळीपासून राज्यातील गावपातळीपर्यंत शासकीय स्वरूपात सर्वज्ञांचा अवतारदिन साजरा होणार आहे. महानुभाव पंथाने या निर्णयाचे स्वागत केले आहे.यावलीच्या स्मशानभूमीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जयंती यावली शहीद येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जन्मस्थान स्मृती मंदिरात ग्राम जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने जन्मस्थान ते मोक्षधाम बाग स्मशानभूमी यावली दरम्यान विशेष रामधून कार्यक्रम आयोजित करण्यात आला.वैशाख महिन्याच्या पहाटे जन्मस्थान ते स्मशानभूमीपर्यंत जय गुरुदेव जयघोषासह रामधून काढण्यात आली. स्मशानभूमी येथे सर्व धर्म आणि पंथांच्या देवी-देवतांच्या मूर्तींचे पूजन करण्यात आले. गत वर्षातील दिवंगतांना सामुदायिक श्रद्धांजली वाहण्यात आली. मार्गावर ठिकठिकाणी पुष्पवर्षाव करण्यात आला. रस्त्यांवर रंगीबेरंगी रांगोळ्या काढण्यात आल्या. हजारो भाविकांच्या कंठातून जय गुरुदेवचा जयघोष झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभेचे माजी उपसभापती प्रा. शरद तसरे होते. प्रमुख वक्ते म्हणून हभप. सुनील महाराज लांजुळकर आणि माहुली पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन वाघ उपस्थित होते. यावली शहीदच्या सरपंच शिल्पा खवले, उपसरपंच नितीन पाचघरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.काशिनाथ जवणे, गजानन देशमुख यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केले. गुरुदेव सेवा मंडळाच्या तरुणाईने मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने आबालवृद्ध, महिला आणि भक्तगण उपस्थित होते.