जगद्गुरु श्री देवनायकाचार्य बिपिन शांतीलाल शाह मेमोरीयल ट्रस्ट आयोजित आरोग्य शिबिराला जनतेचा उत्तम प्रतिसाद

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.22
जगद्गुरु श्री देवनायकाचार्य बिपिन शांतीलाल शाह मेमोरियल ट्रस्ट व श्री साई मंदिर साईनगर वहाळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २१/१/२०२४ रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत साई मंदिर साईनगर, वहाळ,तालुका पनवेल येथे आरोग्य शिबीर व मोफत तपासणी शिबीर, हेल्थ कार्ड,आयुष्यामान भारत कार्ड शिबीर मोठया उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दिल्ली उच्च न्यायालयाचे वकील सुनील मिश्रा, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त अनंत देशमुख यांची विशेष उपस्थिती होती.अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त अनंत देशमुख यांनी अन्न पदार्थ संदर्भात अन्नाची निगा कशी राखावी, कोणते अन्न चांगले, कोणते अन्न खराब असते. अन्न पदार्थची ओळख उपस्थितांना करून दिली. विद्यार्थी व पालकांना समजेल अशा सोप्या भाषेत मार्गदर्शन केले.यावेळी श्री साई मंदिर वहाळचे संस्थापक अध्यक्ष रवीशेठ पाटील यांनी सदर आरोग्य शिबिराचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सदर आरोग्य शिबिरात दातांची तपासणी, हेल्थ चेकअप, तोंडाचे कॅन्सर, शुगर,बीपी तपासणी करण्यात आली.तसेच हेल्थ कार्ड,आधार कार्ड काढून देण्यात आले. विविध तपासणी मोफत करून रुग्णांना मोफत औषधे देण्यात आली.
आरोग्य शिबिरासाठी श्री साई मंदिर संस्थान वहाळ,ओम शिव मल्हार ग्रुप, त्वस्था ग्रुप, शिवमल्हार चॅरिटेबल ट्रस्ट, अजिंक्य सामाजिक संस्था दिवाळे कोळीवाडा, जीवन आधार सेवा संस्था पवई मुंबई, स्पर्श एक सामाजिक जाणीव प्रतिष्ठान या संस्थेचे मोलाचे सहकार्य लाभले. या सर्व संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी सर्वत्र फिरून रुग्णांची आस्थेने विचारपूस करून त्यांना योग्य मार्गदर्शन केले.या आरोग्य शिबिराला सर्वांनी सहकार्य केल्याने जगद्गुरु श्री देवनायकाचार्य बिपिन शांतीलाल शहा मेमोरियल ट्रस्टचे प्रेसिडेंट वी.के उपाध्याय,खजिनदार प्रभाकर आडिवरेकर,सचिव के. एम. त्रिपाठी,मॅनेजमेंट कमिटी मेंबर जी वी के राव आणि सर्व सहकारी पदाधिकाऱ्यांनी सर्व संस्था संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांचे तसेच साई मंदिर वहाळचे संस्थापक रवीशेठ पाटील, मढवी गुरुजी, विश्वास पाटील, बाळाराम पाटील यांचे आभार मानले. एकंदरीत या आरोग्य शिबिराला जनतेचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.