सावकारांच्या घरी धाडी टाकून काही संशयास्पद कागदपत्रे जप्त

मोर्शी /त्रिफुल ढेवले,दि 16
मोर्शी : अवैधपणे सावकारी करीत असल्याच्या तक्रारीवरुन मोर्शी येथे शुक्रवारी दोन व्यक्तींच्या घरी धाडी टाकून काही संशयास्पद कागदपत्रे जप्त करण्यात आली. दरम्यान त्या दोन्ही व्यक्तींना आगामी सोमवार, १७ फेब्रुवारीला जिल्हा उपनिबंधक यांच्या कार्यालयात हजर होऊन खुलासा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सबंधितांतर्फे सादर केल्या जाणाऱ्या खुलाशानंतर संशयास्पद कागदपत्रांची सत्यता तपासून पाहिली जाईल. या तपासणीमध्ये कागदपत्रे वादग्रस्त न निघाल्यास संबंधितांना ‘क्लिन चीट’ दिली जाणार असून तसे न झाल्यास त्या प्रकरणाची सत्यता पडताळून होईपर्यंत सुनावणी घेतली जाणार आहे. दरम्यान सुनावणीअंती कागदपत्रे अवैध सावकारीला बळ देणारी ठरली, तर त्यांच्याविरुद्ध स्थानिक पोलिसांत तक्रार दाखल केली जाणार आहे. दरम्यान शुक्रवारच्या धाडसत्रात दोघांच्याही घरी काही कागदपत्रे, धनादेश आणि कोरे मुद्रांक, इसार पावती, नोंदवही आढळून आली होती. सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी ती जप्त केली आहेत. सुनील रामकृष्ण निंभोरकर, रा, पार्डी, ता. मोर्शी आणि सुधीर महादेवराव पचारे दुर्गानगर, मोर्शी असे धाड टाकलेल्या अवैध सावकारांची नावे आहेत. यासाठी जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार यांनी दोन पथक गठित केले होते. त्यापैकी एका पथकाचे नेतृत्व सहाय्यक निबंधक राजेश भुयार तर दुसऱ्या पथकाचे नेतृत्व वरुडचे सहायक निबंधक आशीष चर्जन यांनी केले. जप्त दस्तऐवजांची तपासणी आता जिल्हा उपनिबंधक कार्यालयाद्वारे केली जाणार आहे.