भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबडेकर स्वाधार योजनेच्या विद्यार्थ्यांना त्रुटीची पुर्तता करण्याची शेवटची संधी

जालना/प्रतिनिधी,दि.3
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविली जाते. सदर योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना देय असलेली रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा केली जाते.
या योजनेसाठी संबंधित लाभार्थ्यांना त्रुटी पुर्तता करण्याबाबत दि. 25 नोव्हेंबर, 2024 रोजी पत्र संबंधीत लाभार्थ्यांच्या मुळ पत्त्यावर पाठविण्यात आलेले आहे. तसेच दि. 24 ऑक्टोबर, 2025 पर्यंत, तसेच दुसऱ्यांदा दि. 31 डिसेंबर, 2024 पर्यंत आणि तिसऱ्या वेळेस दि. 15 फेब्रुवारी, 2025 पर्यंत अंतीम संधी त्रुटी पुर्तता करण्याबाबत कळविण्यात आलेले आहे.
वरील आर्थिक वर्षातील विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत त्रुटी पुर्तता सादर न केल्यास सदरील अर्ज नस्तीबद्ध करण्यात येतील. व त्यानंतर सन 2021-22 ते सन 2022-23 या कालावधीतील कोणत्याही विद्यार्थ्यांना त्रुटी पुर्ततेची संधी दिली जाणार नाही. तसेच कोणताही विद्यार्थी स्वाधार योजनेच्या लाभापासून वंचीत राहिल्यास त्यास सदरील कार्यालय जबाबदार राहणार नाही, असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण जालना यांनी यापुर्वीच पत्राद्वारे केलेले आहे.
त्याअनुषंगाने सन 2021-22, सन 2022-23 वर्षामध्ये अर्ज सादर केलेल्या फ्रेश व नुतनीकरण ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापपर्यंत त्रुटीची पुर्तता केलेली नाही, अशा सर्व विद्यार्थ्यांच्या संचिका नस्तीबध्द करण्यात आलेल्या आहेत. याची लाभार्थ्यांनी नोंद घेण्याचे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.