pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

मॉडेल सोलार व्हिलेज योजनेसाठी प्रत्येक गावाने चांगले काम करावे:जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन, विजेत्या गावाला मिळणार 1 कोटी‎

0 3 8 6 5 4

मोर्शी/त्रिफुल ढेवले,दि 3

मोर्शी : केंद्र शासनामार्फत पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत मॉडेल सोलार व्हिलेज योजना येत्या सहा महिन्यांसाठी राबवण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत निवड झालेल्या गावांनी सर्व अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पांची क्षमता दहा मेगा वॅटपर्यंत नेणे अपेक्षित आहे. विजेत्या गावांना एक कोटी रुपयांचे केंद्रीय वित्तीय साहाय्य मिळेल. दरम्यान स्पर्धेत विजयी होण्यासाठी प्रत्येक गावाने चांगले काम करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी सोमवारी येथे केले. पीएम सूर्यघर मोफत वीज योजने अंतर्गत मॉडेल सोलार व्हिलेज योजनेचा सोमवारी जिल्हाधिकारी येरेकर यांच्या हस्ते नियोजन भवन येथे शुभारंभ झाला. महाऊर्जेचे विभागीय महाव्यवस्थापक प्रफुल्ल तायडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बायस, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रीती देशमुख तसेच प्रकल्प अधिकारी, सरपंच, उपसरपंच यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, पारंपरिक ऊर्जा स्रोतावरचे अवलंबित्व कमी करून अपारंपरिक ऊर्जा स्रोतावर भर देण्याचा निर्धार शासनाने केला आहे. यादृष्टीने स्पर्धेत सहभागी झालेल्या गावांत स्पर्धेच्या कालावधी दरम्यान जास्तीत -जास्त विविध अपारंपरिक ऊर्जा साधने, सौर उपकरणे लावणे गरजेचे आहे.यासाठी सरपंच, उपसरपंच तसेच गावकऱ्यांनीही पुढाकार घ्यावा. सर्व उपकरणांमध्ये पीएम सूर्यघर योजनेअंतर्गत जास्तीत -जास्त घरांवर ‘सोलर रूफ टॉप’ प्रकल्पाची उभारणी करावी. तसेच पीएम कुसुम योजनेअंतर्गत जास्तीत -जास्त सौर पंप अथवा इतर विकेंद्रित अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प आस्थापित करणे आवश्यक आहे. या सर्व अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पांची क्षमता दहा मेगा वॅटपर्यंत असणे आवश्यक आहे. यासाठी सीएसआर निधी, विभागाचा निधी किंवा जिल्हास्तरीय निधी व अन्य उपलब्ध असलेल्या निधीचा वापर करता येईल. तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून त्यांचेही सहकार्य घेता येईल. हा शासकीय उपक्रम पूर्ण होण्यासाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. याबाबत गावकऱ्यांमध्ये जनजागृती निर्माण करून सहा महिने विशेष प्रयत्न करून उद्दिष्ट पूर्ण करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सौर कृषीपंप योजना अत्यंत महत्त्वाची आहे. दिवसा वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे शेतकऱ्यांना रात्री शेतात पाणी द्यावे लागते. परंतु सौर कृषी पंप योजना यासाठी शेतकऱ्यांना मदतनीस ठरत आहे. तसेच मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनादेखील शेतकऱ्यांना लाभदायी ठरत आहे. याबाबत जनजागृती निर्माण करावी. स्पर्धेतून मिळालेल्या निधीमध्ये गावाचा विकास होण्यास मदत होणार असल्याचा विश्वासही जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेच्या मॉडेल सोलार व्हिलेज योजनेअंतर्गत अमरावती तालुक्यातील वलगाव, भातकुली तालुक्यातील पूर्णा नगर, धामणगाव रेल्वे तालुक्यातील मंगरुळ दस्तगीर, तिवसा तालुक्यातील वऱ्हा, मोर्शी तालुक्यातील हिवरखेड, चांदूर बाजार तालुक्यातील घाटलाडकी, अचलपूर तालुक्यातील धामणगाव गढी, अंजनगाव सुर्जी तालुक्यातील कापूस तळणी, दर्यापूर तालुक्यातील वडनेर गंगाई तसेच वरुड तालुक्यातील जरुड या गावांची निवड झाल्याचे विभागीय महाव्यवस्थापक प्रफुल्ल तायडे यांनी सांगितले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 8 6 5 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे