नेरपिंगळाईच्या गणेशोत्सवला शतकी परंपरा

ता मोर्शी/प्रतिनिधि,दि.31
स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी देशभक्तीची भावना जागविण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना आणली. नेरपिंगळाईतील लिंगायत वीरशैव समाजाच्या मठात यापूर्वीपासून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होतो. याला शेकडो वर्षांची परंपरा लाभली आहे.मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई येथील गंगाधर स्वामींचा मठ उज्जन येथील वीरशैव समाजाच्या मठाशी संलग्न आहे. वीरशैवाचे रंभापुरी, उज्जैनी, केदार, श्री शैल व काशी अशी पाच पीठ आहेत. मठाची स्थापना बाराव्या शतकातील आहे. बसव क्रांतीनंतर बाराव्या शतकातील सर्व बसव कल्याण विखुरल्या गेले होते. त्यापैकी शरणाई मातोश्री नेरपिंगळाई येथे पोहोचल्या. त्यांनी मठातच वास्तव्यास सुरुवात केली. शरणाई यांचा पुत्र बाळ विस्व त्यांच्यासोबत होता. बाळ विस्व अचानक बेपत्ता झाला होता. त्यामुळे शरणाई यांनी श्री गणेशाची आराधना करून नवस केला. यामुळे चमत्कार होऊन बाळ बिस्व भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीला घरी सुखरूप परत आला. नवस पूर्ण झाल्याने शरणाई यांनी श्रीगणेशाची स्थापना केली. तेव्हापासून मठात सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात झाली, अशी आख्यायिका सांगितली जाते. शरणाई यांना पावणारा श्रीगणेश आपल्यालादेखील पावतो, अशी भक्तांची श्रद्धा आहे. शरणाईने स्थापन केलेल्या जागेवर आजही श्रीगणेशाच्या स्थापनेची माती ठेवण्यात येऊन त्यावर धार्मिक काशीखंड ग्रंथाचे संस्कार केले जातात. यानंतर ही माती अमरावती येथील मूर्तीकार आजने यांच्याकडे पाठविली जाते. मूर्ती सहा ते सात फूट उंचीची असून परंपरागत स्वरूपाची असते. बाराव्या शतकानंतर सुरू झालेला सार्वजनिक गणेशोत्सव आजही तसाच आहे.
१२ तास चालते मिरवणूक
गणेशोत्सवादरम्यान मठात दररोज दिंड्या येतात. गणपतीसमोरील हौदात ढोल वाजवितात. दहा दिवस चालणाऱ्या उत्सवात दूरवरून भक्त येत असतात. विसर्जनाच्या दिवशी मठातील गणपतीला मध्यरात्री नेण्यात येते. तीर्थ समोरच्या गणेश थिएटर येथे पूजा होते. यानंतर मठातील गणपती विसर्जनाकरिता निघतो. सुमारे रात्री एक ते दीड वाजतापासून मिरवणूक निघून दुसऱ्या दिवशी सायंकाळी पाच वाजता गणपतीचे विसर्जन होते. बारा तासाहून अधिक काळ ही मिरवणूक चालते. मठातील गणपतीच्या मागे गावातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे गणपती असतात. मठातील गणपतीच्या विसर्जनानंतरच आजही अन्य मंडळाचे गणपती विसर्जित केले जातात. संपूर्ण गणेशोत्सवादरम्यान गावाला महोत्सवाचे स्वरूप असते. गावात विसर्जनादरम्यान मोठी जत्रादेखील भरत असते.
लोटांगणाची परंपरा
शेकडो वर्षांची परंपरा असणाऱ्या मठातील गणपतीचे विसर्जन नदीत केले जाते. यानंतर नदीत आंघोळ करणाऱ्या भाविकांचे लोटांगण सुरू होते. ते लोटांगणाद्वारे मठात पोहोचतात. मठात त्यांच्यावर तीर्थ टाकल्यानंतर लोटांगण टाकणारे ताजेतवाने होऊन उठतात.



