pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

शेतकऱ्यांनी तुती लागवड करून आर्थिक प्रगती साधावी  – जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांनी रेशीम प्रक्रीया उद्योगाच्या माध्यमातून प्रगती करण्याचे आवाहन; जालना  जिल्ह्यात महारेशीम अभियानातंर्गत सर्वाधिक 1,762 एकरासाठी नोंदणी

0 1 7 4 1 0

जालना/प्रतिनिधी,दि.29

महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांनी पुढाकार घेवून चॉकी किटक संगोपन, निर्जंतुकीकरण पथक, तुतीचे उर्वरित काड्यापासून कंपोस्ट खत तयार करणे, रेशीम धागा रंगनी करून विणकामासाठी तयार करने, हातमागवर रेशीम कपडाचे विणकाम करणे आदी प्रक्रीया सुरू करून आर्थिक उत्पन्न वाढविण्याची संधी जालना जिल्ह्यात आहे.  यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. तर रेशीमची मागणी वाढत असल्यामुळे रेशीम कोषांचा दर शाश्वत असल्यामुळे शेतकऱ्यांनी तुती लागवड करून आर्थिक प्रगती साधावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले.
महारेशीम अभियान अंतर्गत शेतकरी मेळावा व प्रशिक्षण कार्यक्रम आज घनसावंगी येथील रयतेचे स्वराज्य चॉकी केंद्र येथे घेण्यात आला.  यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. कार्यक्रमास जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जी. आर. कापसे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल सूर्यवंशी, छत्रपती संभाजीनगरचे रेशीम विकास अधिकारी बबनराव डेंगळे, जालन्याचे रेशीम विकास अधिकारी अजय मोहिते, उपविभागीय कृषी अधिकारी रामेश्वर रोडगे, तहसीलदार योगिता खटावकर, तालुका कृषी अधिकारी सखाराम पवळ, रेशीम विभागाचे कर्मचारी एस. आर. जगताप, एस.यु.गणाचार्य, जी.के.गीते, रेशीम धागा निर्मिती केंद्र चालक गणेश शिंदे व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते,
महारेशीम अभियान अंतर्गत जालना जिल्ह्याने राज्यात सर्वाधिक 1,762 एकरची नोंदणी केल्या बद्दल संबधित अधिकारी – कर्मचाऱ्यांचे अभिनंदन जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ यांनी केले. तसेच याकरीता उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्रक देवून सन्मानित करण्यात आले. रेशीम रत्न भाऊसाहेब निवदे यांचे रयतेचे स्वराज्य चॉकी केंद्राचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांचे हस्ते यावेळी करण्यात आले.
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जी. आर. कापसे यांनी जालना जिल्ह्यात पारंपरिक कापुस व सोयाबीन या पिकांची सर्वाधिक लागवड करण्यात येते, परंतु बदलत्या हवामानामुळे या पिकांपासून खात्रीशीर उत्पन्न मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यानी पीक पध्दतीमध्ये बदल करून रेशीम शेतीचा अवलंब करून आपले उत्पन्न वाढवावे, असे सांगितले.
रेशीम विकास अधिकारी श्री. मोहिते यांनी  तुती नर्सरीबाबत प्रशिक्षण दिले. तसेच महारेशीम अभियान अंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी जानेवारी महिन्यात तुती रोपवाटीका करून आपल्या लागवडी करीता स्वतः तुती रोप तयार करण्याबाबत आवाहन केले. रेशीम रत्न शेतकरी भाऊसाहेब निवदे यांनी “नवीन रेशीम उद्योग करणाऱ्या शेतकऱ्यांना रयतेचे स्वराज्य चांकी केंद्रमार्फत तीन मोल्ट पास करून चॉकी पुरवठा करण्यात येईल, यामुळे शेतकऱ्यांना केवळ 12 दिवसच रेशीम किटकांना पाला द्यावा लागेल, असे सांगितले.
प्रगत रेशीम शेतकरी संदीप लोंढे, सिध्देश्वर भानुसे, बोरगावचे भागवत भानुसे, म. चिंचोलीचे घोगरे, पानेवाडीचे विश्वंभर तिडके, ढाकेफळचे आण्णासाहेब चांदर, येवलाचे रूषी तांगडे यांनी आपले रेशीम शेतीमधील उत्पन्न व त्यामुळे झालेली प्रगतीचे अनुभव उपस्थित शेतकऱ्यांना सांगितले. भोगगाव येथील रेशीम शेतकरी ज्ञानोबा मुळे यांनी अतिशय मार्मिक भाषेत इतर पिकांच्या तुलनेत रेशीम शेती कशी फायद्याची आहे,  सर्व शेतकऱ्यांनी नोंदणी करुन आपली प्रगती साधावी. असे सांगितले. कार्यक्रमा दरम्यान 230 नवीन शेतकऱ्यांनी नोंदणी केली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे