“तिच्यातली मी….” शोधताना :-डॉ करुणा हिवाळे- खिल्लारे

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.29
नवरात्री निमित्ताने मला दिक्षा वाठोरे व गायत्री सोरटी संचालिका देवगिरी इंग्लिश स्कूल यांच्या रास गरबा वर्कशॉप मध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली.15 दिवसाच्या कार्यशाळेनंतर शेवटच्या दिवशी आयोजित केलेल्या कार्यक्रमाबाबत व एकंदरीत 15 दिवसाच्या क्लास मधील अनुभवानंतर व्यक्त व्हावेसे वाटले म्हणून लिहिण्याचा प्रयत्न करत आहे.सर्वच मैत्रिणीनी भरभरून लिहिलं, आनंद ही भरभरून उपभोगला.
तसंही महिलांना निवांतपणा खायला उठतो.
आज तर बऱ्याच जणींना करमले नसेलच. सुन्या सुन्या मैफिलीत फोटो पाहिले असतील.
दिक्षा ची व गायत्री मॅडम यांची तर कमालच आहे.एका स्त्री ला शिकविणे सोपे काम नाही पण ह्यांनी माझ्या सारख्या जवळपास शंभर महिलांना शिकविले अतिशय कठीण अशक्यप्राय काम केले होते.
*मी*
वर्कशॉप मध्ये सहभागी होण्यापासून कशी बदलत गेले.मनापासून सहभाग घेतला.म्हणजे मी कधी सावन सेल संपतो व कधी गरबा चा वर्कशॉप जॉईन करते असं झालं होतं.शेवटी तसंच झालं, झालं सुरू त्यात मग शेजारी ,मैत्रिणी व नातेवाईक यांना आणण्याचा खटाटोप करत होते. काहींनी आवर्जून यावं तर काहींनी येऊ नये असं मनापासून वाटलं कारण ती माझ्यापेक्षा चांगलं करायची.मी जरा तिच्या पुढे डावीच …..
हे सत्य तरीही
*मी* स्वीकारत नाही,कारण *मी* काही दिवस क्लास ला नियमित येऊ शकले नव्हते.मग ती जरा सरस करेलच की .*मी* पूर्णवेळ , पूर्ण दिवस आले असते तर मला ही शक्य झाले असते.पण मुलांचे आजारपण ,दवाखान्यासाठी गावाकडून आलेल्या पाहुण्यांचे डब्बे,घरातील अचानक ची काही कामे इत्यादी मुळे *मी* जरा मागेच राहिली होती.पण *मी* माघार घेण्यास तयार नव्हते.
गरबा शिकल्यानंतर *मी* सराव नियमित करत असे.क्लास ला निघायची तयारी *मी* चार वाजल्यापासून करत असे. माझा उत्साह पाहून *मी* माझीच आश्चर्य व्यक्त करत होते.
*मी* पहिल्या रांगेत उभं राहण्यासाठी घाई , धडपड करायची.खरं तर हा माझा स्वभाव नाही पण *मी* आता स्वतःला वेगळं म्हणजे *मी* मध्ये गुंतू लागली.*मी* समोर येण्यासाठी स्वतः हून स्पर्धा करत होते.
हे सगळं सुरू असताना *मी* वय, दिसणं, व्यक्तिमत्त्व,जवाबदारी हे दुय्यम केलं होतं. कार्यक्रम च्या आदल्या रात्री तर *मी* माझ्यात नव्हते,वेगळ्या विश्वात रमले होते. *मी* मनापासून सुंदर दिसण्याचा प्रयत्न करत होते. सर्व ज्वेलरी ची तयारी *मी* मिशनमोड वर केली.रॅम्पवॉक कसा करावा ह्यासाठी जुन्या अनुभवी महिलांच्या जवळ जाऊन *मी* कानोसा घेत होते. कार्यक्रम च्या दिवशी *मी* सर्वांच्या केंद्रस्थानी, प्रेक्षक मला पाहतील,*मी* त्यांना दिसली पाहिजे ह्याच मानसिक दुविधेत होते. *मी* कशी सुंदर दिसते हे सोबतच्या ,क्लास च्या व कार्यक्रम पाहणाऱ्यांनी बोलावं असं सारखं मनात येत होतं. रॅम्प वॉक करतांना बाकीच्यांपेक्षा माझं अधिक प्रभावी कसं होईल हा विचार मला बेचैन करत होता पाहुण्यापुढे काही वेगळं काय करता येईल ह्यावर माझी विचारप्रक्रिया सुरू झाली.पाहुणे- परीक्षक ह्यांना प्रभावित करण्यासाठी मी काही बोलून दाखवू की काही हावभाव करू का काही सामाजिक संदेश देऊ.असे एक ना अनेक प्रकारचे विचार सुरू झाले, विशेष म्हणजे हे मला कुणाला माहिती पण होऊ द्यायचे नव्हते. कारण माझी कल्पना मैत्रिणीला आवडली व तिने ती माझ्या आधीच केली तर….
काय हे विचार माझ्या मनामध्ये येत होते ह्याने सुद्धा मी फार अस्वस्थ झाले होते.
बरं, लग्नाला बरीच वर्षे झाली असल्याने नवऱ्याला माझ्यामधील नवीन *मी मध्ये फार काही उत्सुकता नव्हती.महिलांचा रास गरबा क्लास आहे व हि शिकायला जाते ,इतकेच त्यांना माझ्या क्लास विषयी चे ज्ञान .बाकी वेळेवर जेवण बनवते घरातील सर्व कामे करते,वेळेत घरी येते ,विषय संपला होता.माझ्या मनातील मी सांगण्याचा प्रयत्न केला तर ते तुझं कर ,मला काय समजते त्यातले असं सांगून पळवाट काढली होती.फार नाही पण सून,बायको, वहिनी,जाऊ व आई ह्या भूमिकेच्या व्यतिरिक सुद्धा मी आहे हेच नवरा स्वीकारत नाही ,दुसऱ्याकडून फार काही अपेक्षा न केलेली चांगली असं म्हणून मी* माझी युद्ध पातळीवर तयारी सुरू केली.माहेरी शेअर करायला गेले तर त्यांनी आधी माझ्या जबाबदारीची मला आठवण करुन दिली.त्यांना असं वाटत होतं की माझ्या बाबत ची तक्रार त्यांच्यापर्यंत येऊच नये ,मग काय माझ्याबाबतचे सर्व निर्णय सासरच्यांनी घ्यावेत,लग्नाआधी आई वडील यांनी व लग्नानंतर सासरच्यांनी .मी एक व्यक्तिमत्व आहे,मला विचार,भावना असतात ह्याचा सर्वांना विसर पडला होता.बरोबरच होतं त्यांचं *मी च कधी स्वतःला ओळखत नव्हते,स्वीकारत नव्हते तर त्यात त्यांचा काही दोषच नव्हता.मी च माझ्या आयुष्याचे सर्व निर्णय समोरच्या व्यक्तीवर सोपविलेले असल्यावर हेच होणार होते. घोडा माझा टांगा माझा मग लगाम त्यांच्या हातात का?
पण क्लास मध्ये मी स्वतः साठी जात असल्याने कुठं तरी स्वतः चा विचार ,भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न सुरू केला.त्यासाठी काही अट्टाहास धरत होते.का ?काही माहिती नाही ? पण *मी* सर्व हे करत असताना माझा मुळस्वभाव विसरले होते. *मी* हेवा द्वेष असं काही करणारी नाही,पण अशा वेळी कदाचित माझा *मी* पणाला असल्याने होत होते.
कित्येक वर्षांनंतर *मी* म्हणून गेल्या पंधरा दिवसापासून जगले.ना कुणाची मुलगी,बहीण,बायको ना आई…
*मी* माझ्यातील क्षमता ,ऊर्जा व आत्मविश्वास वाढवत होते,मलाच *मी* न्याहाळत होते,माझ्याशीच *मी* स्पर्धा करत होते ,कोणतीच भूमिका नव्हती आणि *मी* चक्क *जिंकले*.
मी फक्त मी होते…



