जागतिक हिवताप दिन २५ एप्रिल – २०२५ चला हिवतापाला संपवु याः पुन्हा योगदान द्या…

जालना/दि.24
जागतिक हिवताप दिन २५ एप्रिल – २०२५
चला हिवतापाला संपवु याः पुन्हा योगदान द्या…
दरवर्षी प्रमाणे जागतिक हिवताप दिन २५ एप्रिल २०२५ रोजी साजरा करण्यांत येतो. यानिमित्त संपुर्ण जिल्ह्यात हिवताप जनजागरण करण्यात येते. डासांमुळे हिवताप, डेंग्यू, चिकुनगुन्या, झिका, जे.ई., हत्तीरोग यासारखे जीवघेणे आजार पसरतात. हिवताप, डेंग्यू झाल्यास रुग्ण शासकिय अथवा खाजगी रुग्णालयात जाऊन उपचार घेतो. परंतु सदरील किटकजन्य आजार होऊ नये याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविणे अत्यंत आवश्यक आहे. सन २०२७ अखेर हिवताप दुरीकरण करायचे असल्याने ध्येय व नियोजन आवश्यक आहे. या वर्षीचे घोषवाक्य’चला हिवतापाला संपवु याः पुन्हा योगदान द्या, पुर्नेविचार करा, पुन्हा सक्रिय व्हा’ असे आहे
हिवतापाचे लक्षणे : थंडी वाजुन ताप येणे, घाम येणे, उलटी, डोकेदुःखी, एक दिवस आड ताप. हिवताप ऑनाफिलीस दुषित मादी मच्छर चावल्यामुळे होतो. किटकजन्य आजारांचा प्रसार करणाऱ्या डासांची उत्पत्ती साचलेल्या पाण्यात होत असते. डास हा साचलेल्या पाण्यात अंडी घालतो. अंडी, अळी, कोष व डास या चार अवस्थेतुन ८ ते १० दिवसांत नवीन डास जन्माला येतो. दुषित मादी डास निरोगी व्यक्तीला चावला की, डास चावतांना मानवाच्या रक्तामध्ये जंतु सोडतात. दुषित एनॉफिलस मादी मच्छर चावल्यामुळे हिवताप हा आजार होतो. महाराष्ट्रामध्ये साधारणतः प्लाझमोडियम व्हाव्हॅक्स (पी.व्ही.) व प्लाझमोडियम फॅल्सीफेरम (पी.एफ.) असे दोन प्रकारचे हिवताप रुग्ण आढळुन येतात. रक्ताच्या तपासणी मध्ये हिवतापाचे निदान होते. हिवताप दुषित पी.व्ही.किंवा पी.एफ.आढळुन आल्यानंतर त्याप्रमाणे औषधोपचार करुन १०० टक्के रुग्ण बरा होतो.
डास प्रामुख्याने ३ प्रकारचे आहेत. १) ऑनॉफिलीस डास हा हिवतापाचा प्रसार करतो, त्यांची उत्पत्ती स्वच्छ पाणीसाठयांमध्ये होते. उदा. नदी, हौद, नाले, विहिरी, तळी. २) एडिस डास हा डेंग्यू, चिकूनगुन्या व झिका या आजारांचा प्रसार करतो, त्याची उत्पत्ती ही घरातील स्वच्छ पाणीसाठयांमध्ये होते. उदा, पाण्याच्या टाक्या, बॅरल, रांजण, हौद, फुटके डबे, निरुपयोगी टायर, नारळाच्या करवंटयामध्ये साचलेले पावसाचे पाणी, घर आणि परिसरात साठलेले किंवा साठविलेले स्वच्छ पाणी, घरातील कुलर, फ्रिजच्या ड्रीप ट्रे मधील पाणी, मनी प्लॅन्ट मधील स्वच्छ पाणी इ. ठिकाणी होत असते. ३) क्यूलेक्स डास हा हत्तीरोगाचा प्रसार करतो, त्याची उत्पत्ती ही अस्वच्छ पाणीसाठयांमध्ये होते, उदा. शौचालयाच्या सेप्टीक टॅंक, तुंबलेली गटारे, पाण्याचे डबके इ.
हिवताप व इतर किटकजन्य आजारांचा प्रसार रोखणे, स्वतःचा डासांपासून बचाव करण्यासाठी जनतेने खालीलप्रमाणे दक्षता घेणे आवश्यक आहे. १) ताप आल्यास त्वरीत डॉक्टरांकडे जावे, डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे आवश्यक चाचण्या कराव्यात. शासकिय रुग्णालयात यासाठी मोफत रोगनिदान व औषधोपचार उपलब्ध आहेत. २) डासोत्पत्ती स्थाने नष्ट करणे अथवा गप्पी मासे सोडणे. ३) घराच्या शौचालयाच्या सेप्टीक टॅंकच्या व्हेंन्ट पाईपला (गॅस पाईप) जाळी अथा कापड बांधावे. यामुळे डासांची उत्पत्ती रोखली जाते. ४) घर व परिसरामध्ये स्वच्छता ठेवावी. ५) गच्चीवरील पाण्याच्या टाक्यांना घट्ट झाकणे बसवावीत. ६) घरातील पाण्याच्या टाक्या/रांजण/बॅरल हौद हे आठवडयातून किमान एकदा घासून पुसून स्वच्छ कोरडे करावेत व ते घट्ट झाकणाने आणि कापडाने नेहमी झाकून ठेवावेत. ७) घरातील/गच्चीवरील/घराच्या परिसरातील भंगार सामान/फुटके डबे/वस्तू / निरुपयोगी टायर याची विल्हेवाट लावावी. या सामानात पावसाचे पाणी साचते व त्या ठिकाणी डासांची उत्पत्ती होते. ८) घरातील कुलर, मनी प्लॉंट / चायनीज प्लॉंटमधील पाणी आठवडयातून किमान एकदा बदलावे स्वच्छ करुन पुन्हा भरावे. ९) झोपतांना मच्छरदाणीचा वापर करावा, पूर्ण अंग झाकले जाईल असे कपडे वापरावेत. १०) डासांपासून संरक्षणासाठी घराच्या दारे खिडक्यांना जाळया बसवाव्यात, क्रिम, मॅट, कॉईलचा वापर करावा. ११) प्रिजचा ट्रे मधील पाणी वेळोवेळी काढून टाकावे. १२) गच्चीवर / अंगणात / घराच्या परिसरात कोठेही पाणी साचणार नाही, याची दक्षता घ्यावी. १३) आरोग्य कर्मचारी/आशा यांना सहकार्य करणे. वरिल प्रमाणे दक्षता सर्वांनी घेतल्यास आपण किटकजन्य आजारांचे प्रमाण नियंत्रणात ठेवू शकू. जागतिक हिवताप दिन यशस्वीपणे राबविण्यासाठी संपुर्ण जिल्ह्यात हस्तपत्रिका वाटप, आशा वर्कर बळकटीकरण कार्यशाळा, ग्रामीण आरोग्य पोषणहार व स्वच्छता समिती सभा, स्वच्छता मोहिम, गप्पी मासे सोडणे, बचत गटांच्या सभा, सेन्सटायजेशन मिटींग, रॅली इत्यादी वरील प्रमाणे कार्यक्रम संपुर्ण जिल्ह्यात सर्व शासकीय आरोग्य संस्थेमार्फत ’ जागतिक हिवताप दिन ’ साजरा करण्यात येणार आहे.
– ( डॉ.जयश्री भुसारे ) जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, जालना.