ज्यांनी पाठीत सुरा खुपसला तेच आज कांशीरामजी यांचा उदोउदो करीत आहेत – इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर

विरेगाव / गणेश शिंदे दि.16
आपल्या सर्वस्वाचा त्याग करुन कांशीरामजी यांनी देशभरातील सरकारी कर्मचारी सामाजिक उद्दीष्टासाठी “बामसेफ” या अराजकीय संघटनेत एकत्र केले. या बामसेफचे तुकडे पाडून पाठीत सुरा खुपसला तेच लोक आज कांशीरामजी यांचा फोटो लाऊन उदोउदो करीत आहेत. ज्यांना जीवंत कांशीराम पचला नाही ते लोक आज मृत कांशीरामजी यांचे फोटो लाऊन समाजात संभ्रम निर्माण करीत आहेत अशी संतप्त भावना सुप्रसिद्ध साहित्यिक व प्रबोधनकार इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी व्यक्त केली.
येथून जवळच असलेल्या देगाव शिवारातील फार्महाऊसवर मान्यवर कांशीरामजी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित समाज प्रबोधन शिबिरात प्रमुख मार्गदर्शक म्हणून अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे संस्थापक नेते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर बोलत होते. सेवानिवृत्त मुख्याध्यापक बालाजी कमलेवाड हे या शिबिराच्या अध्यक्षस्थानी होते.
पंचायत समितीचे माजी उपसभापती व्यंकट सुरावाड यांचे हस्ते या शिबिराचे उदघाटन करण्यात आले. स्वाती देशमाने, कविता सुरावाड, विठ्ठल नरवाडे यांनी यावेळी स्वागत गीत म्हटले तर हरिदास पुसे (छ. संभाजीनगर) यांनी गुरु रविदास, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे आणि कांशीरामजी यांच्या जीवनावर प्रबोधन गीते सादर केली.
आपल्या प्रबोधनात इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर पुढे म्हणाले की, कांशीरामजी जीवंत असतांना डी. के. खापर्डे, वामन मेश्राम, तेजेंदरसिंग झिल्ली या लोकांनी काँग्रेसच्या ईशाऱ्यावर बामसेफ फोडली व कांशीराम यांना कमजोर करण्याचा प्रयत्न केला. हे फूटपाडे लोकही आज एक राहिले नाहित. त्यांच्या रजिस्टर्ड बामसेफचे आज रिपब्लिकन पक्षासारखे सतरा तुकडे पडले आहेत. हेच लोक आज कांशीरामजी यांचे फोटो लाऊन बामसेफ सांगत आहेत पण उपलब्धी शून्य आहे. अशा फूटपाड्या लोकांपासून बहुजनांनी सावध रहावे. कांशीरामजी यांची मूळ बामसेफ पुनःश्च जिवीत झाली पाहिजे यासाठी काम करणे आवश्यक आहे.
वसंत दिनानाथ यांनी प्रास्ताविक केले तर परमेश्वर चंद्रे यांनी सूत्रसंचलन केले. अशोक केळकर, रमेश धुतमल, विनोद कांबळे, प्रसेनजीत मोरे, युवराज भांगे यांनी यावेळी थोडक्यात आपले मनोगत मांडले. मध्यंतरीच्या भोजनानंतर प्रश्नोत्तराचा तास घेण्यात आला. त्यानंतर समारोपाच्या दोन तासाच्या भाषणातून इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी आजच्या परिस्थितीत कांशीरामजी यांची विचारधारा कशी आवश्यक आहे ते समजावून सांगितले. यावेळेस समता परिषद संघर्ष निधी अकरा हजार रुपये अध्यक्षांकडे सुपूर्द करण्यात आला.
विनायक वाघमारे यांच्या आभार प्रदर्शनापूर्वी प्रबोधन शिबिराची सांगता हरिदास पुसे यांच्या दोन क्रांतीगीतांनी करण्यात आली. जवळपास साठ युवक व विद्यार्थी या शिबिरात पूर्णवेळ सहभागी झाले होते. नोट्ससाठी त्यांना केशव सोनटक्के यांचेतर्फे पेन व वह्या देण्यात आल्या होत्या.