शिवजयंतीच्या निमित्ताने बालसंस्कार विद्यार्थांनी दिला व्यसनमुक्तीचा संदेश
पालखी सोहळा ठरला विशेष आकर्षण

आनिल वाढोणकर/छ.संभाजीनगर,दि.19
बजाजनगर : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरूपीठ-त्र्यंबकेश्वर येथील पिठाधीश परमपूज्य गुरुमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे यांच्या आशिर्वादाने व आदरणीय नितीनभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली शिवजयंती निमित्ताने आगळ्या वेगळ्या सोहळ्याचे आयोजन बजाजनगर येथील साई श्रध्दा पार्क येथे करण्यात आले होते.
श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र – बजाजनगर अंतर्गत जवळपास ५१ ठिकाणी बालसंस्कार वर्ग घेण्यात येतो. यापैकी साई श्रध्दा पार्क येथे १९ फेब्रुवारी रोजीच्या शिवजयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित युवा पिढी निर्माण व्हावी या उद्देशाने व्यसनमुक्तीचा संदेश देणार्या पालखीचे आयोजन बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागाच्या वतीने करण्यात आले होते. वडगाव (को.) येथील सरपंच श्री. सुनील काळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटो पुजनाने शिव जयंती उत्सवास सुरुवात झाली. आज समाजातील युवा पिढीमधील व्यसनाधीनता खूप मोठा चिंतेचा विषय आहे. यामुळे तो युवक स्वतःच अस्तित्व संपुष्टात तर आणतोच परंतू व्यसनामुळे परिवाराला पण अतोनात दुःख, त्रास सहन करावा लागत आहे. वेळीच युवा पिढीला योग्य मार्गदर्शन व समुपदेशन मिळाले तर ते स्वतःच अस्तित्व टिकवू शकतात. या उद्देशाने व्यसनमुक्तीचा संदेश शिवजयंतीच्या निमित्ताने बालसंस्कार विद्यार्थांनी दिला आहे.
साई श्रध्दा पार्क, सीता नगर तसेच बजाजनगर येथील शिवस्मारक पर्यंत पालखी मिरवणूक काढण्यात आली. जवळपास १५० बालसंस्कार विद्यार्थांनी गळ्यात व्यसनमुक्ती बॅनर अडकून सोहळ्यात सहभाग घेतला. अनेक विद्यार्थी छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या वेशभूषा करून सोहळ्यात सहभागी झाले होते. साई श्रध्दा पार्क सोबतच यशवंती काॅलनी व अभिनंदन सोसायटी येथील बालसंस्कार वर्गाच्या विद्यार्थी व प्रतिनिधींनी सोहळ्यामध्ये सहभाग नोंदवला. बालसंस्कार विद्यार्थांनी राबवलेल्या अनोख्या उपक्रमाचे कौतुक परिसरातील नागरिकांनी केले.