जागतिक हिवताप दिनानिमित्त 25 एप्रिल रोजी मोहिमेचे आयोजन

जालना/प्रतिनिधी,दि. 24
जागतिक हिवताप दिन म्हणुन 25 एप्रिल हा दिवस साजरा करण्यात येतो. चला हिवतापाला संपवु या,पुन्हा योगदान द्या,पुन्हा विचार करा,पुन्हा सक्रिय व्हा’ हे या वर्षीचे घोषवाक्य आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार,भारतामध्ये सन 2027 पर्यंत हिवताप दुरीकरण करण्याचे ठरविले आहे. संपुर्ण जिल्ह्यामध्ये दि.25 एप्रिल 2025 रोजी राबविण्यात येणाऱ्या मोहिमेसाठी आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे. तसेच हिवताप, डेंग्यु, चिकुणगुन्या व किटकजन्य आजारापासुन संरक्षण मिळविण्यासाठी या मोहिम काळातच नाही तर नेहमीसाठी आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा.घरातील पाणीसाठयावर झाकण ठेवावे,नाल्या,गटारे वाहते ठेवावे. आठवडयातुन एक दिवस कोरडा दिवस म्हणुन पाळावा,मच्छर दानीचा वापर करावा,उघडया खिडक्यांना जाळया बसवावे, संडासच्या व्हेंट पाईपला जाळी बसवावी, भंगार सामान व रिकामी टायर यांची विल्हेवाट लावावी, कुलर फ्रिजच्या ड्रिपमधील पाणी स्वच्छ करावे,पाण्याचा हौद, टाक्या, रांजन आदि दर आठवड्याला स्वच्छ करावेत. थंडी वाजुन ताप येणे, मळमळ होणे, डोके दुखणे, अंगदुखी इत्यादी हिवतापाची लक्षणे आढळुन आल्यास जवळच्या आरोग्य संस्थेत संबंधीत वैद्यकिय अधिकारी यांच्या मार्फत तपासणी करुन योग्य औषध उपचार घ्यावा, असे जिल्हा हिवताप अधिकारी जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.