जे.जे.ठाकूर स्कूल संस्थेतर्फे माजी आमदार मनोहरशेठ भोईर हे ‘बेस्ट लीडर’ पुरस्काराने सन्मानित

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.08
उरण तालुक्यातील आवरे गावाच्या बाहेर डोंगराच्या पायथ्याशी इयत्ता दहावी पर्यंत जे.जे.ठाकूर इंग्लिश मिडीयम स्कूल आहे.सदर शाळेपर्यंत जाण्याचा रस्ता चांगला नसल्या कारणाने विद्यार्थी व पालक यांना अडचणीचा होता. पावसाळ्यात तर डोंगराच्या पाण्याचा ओहोळ वाहत असल्याने सर्वत्र दलदलीतून विद्यार्थ्यांना व पालकांना सदर शाळेपर्यंत ये जा करावी लागत असे.शाळेमध्ये जवळपास ३१५ विद्यार्थी आवरे , गोवठणे व पाले गावातील शिक्षण घेत आहेत. सदर संस्थेचे संस्थापक अशोक ठाकूर यांनी हा रस्ता चांगला होण्यासाठी अनेक माध्यमातून खूप वेळा प्रयत्न केले.परंतु पदरी निराशाच आली.शेवटी त्यांनी आमदार मनोहरशेठ भोईर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आापल्या विद्यार्थ्यांची रस्त्याची समस्या मांडली.त्यावेळी समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन क्षणाचाही विलंब न करता सदर शाळेपर्यंत जाण्याचा रस्ता चांगला होण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा शब्द शिक्षणप्रेमी मनोहरशेठ भोईर यांनी दिला. जर शासनाचा निधी उपलब्ध झाला नाही तर स्वतःच्या पैशाने हा रस्ता पूर्ण करून देण्याचेही आश्वासन दिले. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले या उक्तीप्रमाणे माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी जवळपास पंचवीस लाख रुपयांचा शासन निधी मंजूर करून गावाच्या मुख्य रस्त्यापासून ते शाळेपर्यंतचा चांगला रस्ता तयार केला.यामुळे संस्थेचे अध्यक्ष अशोक ठाकूर ,विद्यार्थी,पालक व ग्रामस्थ यांच्या मनात आनंदाचे वातावरण पसरले.
सदर रस्ता पूर्ण होण्यासाठी सरपंच श्रीमती निराबाई पाटील,सदस्य संतोष पाटील, कौशिक ठाकूर ,महेश गावंड,अमित म्हात्रे,प्रशांत म्हात्रे,कल्पेश पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. दिलेला शब्द पूर्ण केल्याने शाळेचे अध्यक्ष अशोक ठाकूर यांनी शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात आपल्या मनोगतात ऋण व्यक्त करत माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या सारखा नेता अजून मला भेटला नाही असे उदगार काढले व मनोहरशेठ भोईर यांना बेस्ट लीडर अवॉर्डने घोषित केले. आणि संस्थेचे अध्यक्ष अशोक ठाकूर यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन मनोहरशेठ भोईर यांना संस्थेतर्फे हा अवॉर्ड दिला व त्यांचे मनापासून आभार मानले.