मयंक म्हात्रे कुलाबा जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.6
भाई जगताप मित्र मंडळ रायगड, मधूराम ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट अलिबाग, ऍड उमेश ठाकूर मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग येथे कुलाबा जीवन गौरव राज्यस्तरीय पुरस्कार २०२४ चे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रिडा, पत्रकार व वैदयकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा शाल श्रीफळ सन्मानचिन्ह गुलाबपुष्प देउन कुलाबा जीवन गौरव राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याच कार्यक्रमात उरण तालुक्याचे सुपुत्र प्रसिद्ध जलतरणपटू मयंक दिनेश म्हात्रे यांना क्रिडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल माजी आमदार पंडित पाटील,आमदार जयंत पाटील , आस्वाद पाटील, ऍड प्रवीण ठाकूर, ऍड उमेश ठाकूर यांच्या हस्ते कुलाबा जीवनगौरव राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी मयंक सोबत मयंकचे आई वीणा दिनेश म्हात्रे, वडील दिनेश म्हात्रे यांनी हा पुरस्कार स्विकारला.आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या १९३ व्या जयंती निमित्त सातिर्जे अलिबाग येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्रदादा म्हात्रे, काँग्रेसचे राजाभाऊ ठाकूर, युवा सेना जिल्हा अधिकारी पिंट्याशेठ ठाकूर, माजी राजिप सदस्य काका ठाकूर, शिवसेना नागोठणे शाखा प्रमुख धनंजय जगताप, माजी शाखाप्रमुख कीर्तिकुमार कळस, संपर्क प्रमुख अनिल महाडिक, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश कांबळे, राजेंद्र वाळंज आदींसह इतर अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
मयंक म्हात्रे हा उरण शहरातील सेंट मेरी स्कूल मध्ये इयत्ता ५ वी मध्ये शिकत आहे. त्याचे वडील दिनेश म्हात्रे, आई वीणा दिनेश म्हात्रे, मागर्दशक शिक्षक किशोर पाटील (केगाव दांडा ), कोच हितेश भोईर (करंजा ) यांचे मयंकला नेहमी मार्गदर्शन लाभले आहे.वयाच्या ५ व्या वर्षापासूनच मयंक पोहण्याच्या स्पर्धेत भाग घेत आहे.मयंक दिनेश म्हात्रे (वय १० वर्ष) याने रविवार ३ डिसेंबर २०२३ रोजी पहाटे ४ वाजून १४ मिनिटांनी पेण तालुक्यातील धरमतर खाडीत उडी घेतली. सकाळी ९ वाजून २७ मिनिटांनी उरण तालुक्यातील करंजा जेट्टीवर पोहोचला. धरमतर जेट्टी ते करंजा जेट्टी हे १८ किलो मीटर अंतर असून हे अंतर मयंक म्हात्रे यांनी केवळ ५ तास 1३ मिनिटात पोहून पार केले. विशेष म्हणजे मयंक म्हात्रे याचे वय १० वर्षे असून त्यांनी हा विक्रम पहिल्यांदाच केला. यापूर्वी त्याने अनेक जिल्हास्तरीय पोहण्याच्या स्पर्धेत भाग घेउन नेत्रदिपक यश मिळविले होते. पहिल्यांदाच धरमतर खाडी (पेण तालुका )ते करंजा जेट्टी(उरण तालुका )हे १८ किलोमीटर अंतर मयंकने ५ तास तास १३ मिनिटात पोहून सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले.या कार्याची दखल घेत त्याला द्रोणागिरी भूषण पुरस्काराने देखील गौरविण्यात आले आहे.मयंक म्हात्रे यांना कुलाबा जीवन गौरव राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याने मयंकवर सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.