माय भारत योजनेद्वारे नागरी संरक्षण स्वयंसेवक नोंदणी सुरु
जालना/प्रतिनिधी,दि.21
माय भारत, भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, (नवी दिल्ली ) अंतर्गत नागरी संरक्षण स्वयंसेवक म्हणून नोंदणी करण्यासाठी देशभरातील तरुणांना सक्रियपणे एकत्रित केले जात आहे. हा देशव्यापी उपक्रम तरुण नागरिकांना राष्ट्रीय कार्यात सहभागी करून घेण्याचा आणि विशेषतः आणीबाणी व संकटाच्या वेळी महत्त्वाची भूमिका पार पाडण्यासाठी सक्षम करण्याचा प्रयत्न करत आहे. नैसर्गिक आपत्ती, अपघात, सार्वजनिक आणीबाणी आणि इतर अनपेक्षित परिस्थितीत नागरी प्रशासनास सहकार्य करू शकणारे एक प्रशिक्षित, प्रतिसादक्षम व लवचिक स्वयंसेवक दल तयार करणे, हे या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. सद्याची परिस्थिती आणि वाढत्या सुरक्षा चिंता लक्षात घेता, एक मजबूत समुदायाधारित प्रतिसाद यंत्रणा उभारण्याची निकड आहे. नागरी संरक्षण स्वयंसेवक स्थानिक प्रशासनाला बचाव व निर्वासन, प्रथमोपचार अशा विविध सेवा देण्यामध्ये मोलाची मदत करतात. नोंदणीसाठी अधिकृत संकेतस्थळः https://mybharat.gov.in नोंदणी प्रक्रिया सोपी आणि सर्वांसाठी खुली आहे. तरुणांनी पुढे येऊन या राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी प्रणीत सांगवीकर यांनी केले आहे.