जालना शहरात खून खून, दरोडे, व्यापार्यांना लुटमार, शाळकरी मुलींची छेड काढणे आदी प्रकार कमालीचे वाढले असून, जनता भयभीत झाली आहे. पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांचेही याकडे दुर्लक्ष दिसून येत आहे. पोलिसांचा वाचक संपला की गुन्हेगाराची हिम्मत वाढली, असा संतप्त प्रश्न जनतेतून उपस्थित करण्यात येत असून, पोलीस प्रशासनाने मरगळ झटकून कठोर पावले उचलावीत; अन्यथा रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा अखिल भारतीय हिंदू महासभेचे प्रदेश संघटन मंत्री धनसिंह सूर्यवंशी यांनी दिला आहे.
यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात धनसिंह सूर्यवंशी यांनी म्हटले आहे की, बियाणे आणि स्टीलनगरी अशी जालना शहराची राज्यात ओळख आहे. येथील व्यापार मराठवाड्यात प्रसिद्ध आहे. मात्र, व्यापार्यांना लुटमार आणि पैशाच्या बॅगा पळविण्याची जणू श्रंखलाच सुरू झाल्याने व्यापारी, उद्योजक यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. गुन्हेगारांची एवढी हिम्मत वाढलीच कशी, पोलीस प्रशासन अस्तित्वात आहे की नाही, असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने ऐरणीवर आले आहेत. कोणी तक्रार देण्यासाठी गेल्यास त्याचीच उलट तपासणी करून प्रश्नांची सरबत्ती केली जात असल्याने न्याय मागावा कोणाकडे, तक्रार देण्यासाठी जावे की नाही, असा प्रश्न पडतो आहे, असे धनसिंह सूर्यवंशी यांनी म्हटले आहे.
आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार तरुणाई टर्मिन नावाची इंजेक्शन घेतात व नायट्रोजनच्या गोळ्याचे सेवन करून गैरप्रकार करतात. ही बाब अतिशय गंभीर आहे. जालना शहराच्या वातावरणात अमुलाग्र बदल झाला असून, तरुणाई व्यसनाधीनतेकडे वळत आहे. त्यातून खून, दरोडे हे प्रकार रोजचेच झाले आहेत. याबाबत पोलीस प्रशासन काहीच करायला तयार नाही.शाळकरी मुलींना छेडण्याचे प्रकारही वाढले आहेत. कुणी तक्रार घेऊन गेल्यास या प्रकाराविरुद्ध मोहीम राबविण्याऐवजी लेखी द्या, असे सांगून पोलीसवाले तक्रारदारांना निरुत्तर करत आहेत. जालन्यात दामिनी पथक कागदोपत्रीच आहे. दोन वर्षात या पथकाने एखादी कारवाई केल्याचे अथवा शाळा महाविद्यालय परिसरात तपासणी केल्याचे दिसून आलेले नाही. छेडछाडीच्या प्रकारामुळे पालक चिंतेत असून, मुलींना शाळेत पाठवावे की नाही, अशा द्विधा मन:स्थितीत ते आहेत. भरधाव वेगाने वाहने पळवली जात आहेत. वेगावर नियंत्रण नाही. त्यामुळे घडणार्या अपघातात निरपराध जनतेचे जीव जात आहेत. कर्णकर्कश कानफोड्या आवाजाच्या बुलेटचे फटाके सुरू आहेत. त्या विरोधात मोहीम राबविण्याचे सौजन्य पोलीस प्रशासनाने दाखविलेले नाही.
गुन्हेगारावर वचक बसण्यासाठी पोलीस प्रशासनाने दंड प्रक्रिया कठोर करणे अत्यंत गरजेचे आहे. गुन्हेगार आणि दरोडेखोरांचा उच्छाद असाच कायम राहिल्यास जनतेला जगणे मुश्किल होऊन बसणार असून, ही बाब लक्षात घेऊन पोलीस अधीक्षकांनी कडक पावले उचलावीत; अन्यथा लोकहितास्त अखिल भारत हिंदू महासभेला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा धनसिंह सूर्यवंशी यांनी दिला आहे.