शासनाच्या लोककल्याणकारी योजनाची प्रचाररथाच्या माध्यमातून प्रचार-प्रसिध्दी

जालना/प्रतिनिधी,दि.11
शासनाच्या विविध कल्याणकारी सर्वसाधारण योजना व सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती जिल्ह्यातील लाभार्थ्यांना व्हावी यासाठी जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना व अनुसूचित जाती उपयोजना सन 2024-25 अंतर्गत जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या प्रचाररथाला आज प्रभारी जिल्हाधिकारी रिता मैत्रवार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ करण्यात आला. तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी सर्वसाधारण योजना व समाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांवर आधारीत भित्तिपत्रिकाचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल सुर्यवंशी, महिला बालविकास विभागाचे एस.जी. कुलकर्णी, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी आदी उपस्थित होते.
या प्रचाररथाच्या माध्यमातून रेशीम शेती उद्योग-शेतकऱ्यांसाठी शाश्वत व सक्षम शेतीचा पर्याय, मॉडेल करिअर सेंटर केंद्र पुरस्कृत योजना, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजना, बालविवाह प्रतिबंध कायदा:2006, पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावे तसेच सामाजिक न्याय विभाग अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, रमाई आवास (शहरी व ग्रामीण) घरकुल योजना, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील मुला/मुलींसाठी शासकीय निवासी शाळा, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, सैनिक शाळेतील अनुसूचित जाती /विजाभज/विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर, मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता शासकीय वसतीगृहे, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना, अनुसूचित जातीच्या मुलां-मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, गटाई कामगारांना पत्र्याचे स्टॉल पुरविणे या योजनांची माहिती प्रचाररथामार्फत लाभार्थ्यां पर्यंत पोहचविण्यात येणार आहे.