मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी अर्ज करण्यास 31 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
जालना/प्रतिनिधी,दि.8
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयानुसार राज्यातील 65 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानापरत्वे येणाऱ्या अंपगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी केंद्र पुरस्कृत योजनेच्या धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात येत आहे. तरी मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी ज्येष्ठ नागरिकांचे अर्ज स्विकारण्यास दि.31 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अशी माहिती समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त अनंत कदम यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत पात्र ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या शारीरिक असमर्थता व दुर्लभतेनूसार सहायभूत साधने उपकरणे खरेदी करण्याकरीता तसेच मनः स्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र आदीव्दारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरीता एकवेळ एकरकमी तीन हजार रूपये पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ वितरण करण्यात येणार आहे. या योजनेकरीता राज्य शासनाकडून अर्थसहाय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दि. 31 डिसेंबर 2023 अखेरपर्यंत वयाची 65 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेले व कौटुंबिक वार्षिक उत्पन्न दोन लाखांच्या आत असलेले ज्येष्ठ नागरिक मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. तसेच या योजनेच्या अंमलबजावणी व लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी महानगरपालिका स्तरावर आयुक्त व जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांकडे आधारकार्ड, मतदानकार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबूक, पासपोर्ट आकाराचे 2 फोटो, स्वयंघोषणापत्र आदि कागदपत्रांची आवश्यकता आहे. तरी इच्छूक व पात्र ज्येष्ठ नागरिकांनी समाज कल्याण विभागाशी संपर्क साधावा. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.