pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंगसंपादकीय

पावसाळयात विजांपासून रक्षण

0 3 2 2 0 5

 जालना, दि.21          

           पावसाळयात विजांपासून रक्षण

भारतात जून महिन्यात मान्सुन ऋतूचे आगमन होते. यावेळी शेतकरी आपल्या शेतीच्या मशागतीला सुरुवात करतात. शेतमजूरही शेतीच्या विविध कामात व्यस्त होतात. या कालावधीत वादळ आणि वीजेच्या कडकडाटसह पावसाला सुरुवात झाल्यास शेतावर काम करणारे शेतकरी-शेत मजूर आणि इतरांना नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागते. दरवर्षी वीज पडून शेकडो नागरिकांना आपले प्राण गमवावे लागत होते. विशेषतः शेतकरी, मेंढपाळ यांना शेतात, जंगलात उघड्यावर वीज, वारा यांचा सामना करावा लागतो.  या पावसाळ्यात पडणाऱ्या वीजेपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सूचविलेल्या गोष्टींची खबरदारी घेतल्यास विजेच्या आपत्तीला तोंड देता येऊ शकते. तसेच विजेपासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी सुरक्षितता कशी  बाळगली पाहिजे हे आपण बघू या.

शेतात काम करीत असतांना वीजा कडाडत असल्यास शेतातील घराचा आसरा घ्यावा. पाण्यात असल्यास तात्काळ पाण्याबाहेर यावे. एखाद्या झाडाजवळ असल्यास झाडाच्या उंचीपेक्षा झाडापासून दुप्पट अंतरावर उभे राहावे. ओल्या शेतात रोपे लावण्याचे व अन्य काम करणाऱ्या व्यक्ती किंवा तलावात काम करीत असलेल्या व्यक्तीनी तात्काळ कोरड्या किंवा सुरक्षित स्थळी जावे. शेतामध्ये काम करीत असतांना सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला नसेल तर शक्यतो जिथे असेल तिथेच रहावे. शक्य झाल्यास पायाखाली लाकूड, प्लॅस्टिक, गोणपाट सारख्या वस्तू अथवा कोरडा पाला पाचोळा ठेवावा. दोन्ही पाय एकत्र करुन गुडघ्यावर दोन्ही हात ठेवून डोके जमिनीकडे झुकवावे मात्र डोके जमिनीवर ठेऊ नये.

शेतात काम करतांना शेतकरी हे विविध कृषी औजारे हाताळत असतात. अशावेळी धातुपासून बनविलेल्या वस्तू यंत्र इत्यादीपासून दूर रहावे. गावाभोवती किंवा शेत, आवार, बाग-बगीचा आणि घर यांच्याभोवती तारेचे कुंपण घालू नये. कारण ते वीजेला सहजपणे आकर्षित करीत असते. धातूची दांडी असल्यास छत्रीचा उपयोग करु नये. वीजेच्या खांबाजवळ थांबू नये किंवा उभे राहू नये. तसेच झाडाखाली उभे राहू नये. उंच जागेवर झाडावर चढू नये. वीज वाहक असलेल्या रेडियेटर, स्टोव्ह, मेटल, लोखंडी पाईप आदी वस्तूपासून दूर रहावे. वीजा कडाडत असल्यास विद्युत उपकरणे बंद ठेवून शक्यतो घरातच रहावे, बाहेर पडू नये. पाण्याचे नळ, फ्रिज, टेलीफोन आदी वस्तूंना अशावेळी स्पर्श करु नये. तसेच वीजेपासून चालणाऱ्या यंत्रापासूनही दूर रहावे. कपडे वाळविण्यासाठी तारेचा वापर न करता, सुतळी अथवा दोरीचा वापर करावा.

कोसळणाऱ्या वीजेपासून संरक्षण करण्यासाठी मजबूत असलेले पक्के घर हे सर्वांत सुरक्षित ठिकाण आहे. शक्य असल्यास आपपल्या घरी वीज वाहक यंत्रणा बसवावी. टेलीफोन आणि विजेचे खांब किंवा टेलीफोन/टेलीव्हिजन टावर यापासून दूर रहावे. आपल्या घराशेजारी किंवा शेत जमिनीच्या आसपास कमी उंचीची झाडे लावावी.

मोठ्या प्रमाणात वीजा चमकत असल्यास किंवा कडकडाट सुरु असल्यास प्लग जोडलेली उपकरणे हाताळू नये. दूरध्वनीचा वापर अशावेळी करु नये. दोन चाकी वाहन, सायकल, ट्रक, ट्रॅक्टर किंवा नौका यावर असल्यास तात्काळ उतरुन सुरक्षित ठिकाणी जावे. अशा परिस्थितीत वाहनातून प्रवास करु नये. एखाद्याच्या शेतावर किंवा घराशेजारी उंच वृक्षाचे खोड अथवा फांदीवर तांब्याची एक तार बांधून तिचे दुसरे टोक जमिनीत खोलवर गाडून ठेवावे. म्हणजे हे झाड सुरक्षित होईल. वाहनातून प्रवास करत असल्यास वाहनातच रहावे. वाहनाच्या बाहेर थांबणे आवश्यक असल्यास धातुचे कोणतेही उपकरण हातात बाळगू नये. जंगलात गेले असल्यास कमी उंचीच्या व दाट झाडांचा आसरा घ्यावा. वृक्ष दलदलीची ठिकाणे अथवा पाण्याचे स्त्रोतापासून शक्यतो दूर रहावे किंवा आकाशाखाली राहण्यापेक्षा लहान झाडाखाली आसरा घ्यावा. मोकळ्या आकाशाखाली राहणे आवश्यक असल्यास खोलगट ठिकाणी रहावे. एकाच वेळी जास्त व्यक्ती एकत्र राहू नये. दोन व्यक्ती असल्यास किमान त्यांचात 10 ते 15 फुट अंतर असणे आवश्यक आहे. पोहणारे किंवा मच्छिमारी करणाऱ्यांनी अशावेळी तात्काळ पाण्यातून बाहेर यावे.

विजेबाबत काही काल्पनीक समज आणि वास्तव

समजूत : वीज एकाच ठिकाणी दुस-यांदा कधीही पडत नाही.

वास्तव : निर्जन स्थळी, उंच इमारतीवरील कळसावर वीज वारंवार कोसळते, जिथे वीज पडण्याची शक्यता जास्त असते, अशा जागा वादळी हवामानात टाळयाव्यात.

समजूत : पाऊस पडत नाही व ढगाळ हवामान नसेल, तर आपल्यावर वीज पडणार नाही.

वास्तव वीज जवळ जवळ 5 कि. मी. अंतरावर सुध्दा पडू शकते. त्यामुळे हवामान ढगाळ नाही, पाऊस नाही, तरीही वीज पडू शकते, वज्राघात (जास्त ताकदीची वीज) कधी कधी 20-25 किमी अंतरावर सुध्दा पडू शकते. अगदी दुर्मिळ प्रसंगी वीज 80 कि.मी. अंतरावर देखील पडल्याच्या घटना घडलेल्या आहेत.

समजूत : चार चाकी वाहनात असतांना रबर टायरमुळे विजेपासून संरक्षण होते.

वास्तव : वीज टायरपासून 2 इंच दुरच राहते हे खरे आहे. पण खरे पाहता, संरक्षण होण्यास टायर बरोबरच धातूचे छप्पर व बाजूमुळे मदत होते. मोटरसायकल, सायकल, उघड्या टपाची चारचाकी वाहने, फायबर ग्लास, प्लॅस्टीकचे कवच असलेली चारचाकी वाहने यांना विजेपासून तसे संरक्षण मिळत नाही. शेतावरील ट्रॅक्टर ट्रॉली यांना जर छप्पर नसेल, तर त्यांनाही तसे संरक्षण मिळत नाही. पण त्यांना छप्पर असेल, तर ती वाहने सुरक्षित राहतात.

समजूत : ज्याच्या अंगावर वीज पडली आहे, ती व्यक्ती विद्युतभारीत असते आणि तिला स्पर्श केल्यास आपल्याला सुध्दा विजेचा झटका बसतो.

वास्तव मानवी शरीर वीज साठवून ठेवू शकत नाही. त्यामुळे वीजबाधित व्यक्तीला स्पर्श करणे वा त्या व्यक्तीला प्राथमिक उपचार करणे, यात मदत करणाऱ्या व्यक्तीला कसलाही धोका नसतो. वरील कल्पित समज अत्यंत चुकीचा आहे. अशा अपसमजामुळे सीपीआर किंवा कृत्रिम श्वासोच्छवास असे प्राथमिक उपचार दिले गेलेले नाहीत. तर एखादी व्यक्ती वाचण्याची 90 टक्के शक्यता असूनसुध्दा ती मृत्युमुखी पडू शकते.

समजूत जर पावसाळी वादळी हवामानात सापडलात, तर झाडाखाली आश्रय घ्यावा.

वास्तव : वीज पडून मृत्युमुखी पडण्याची जी प्रमुख कारणे आहेत, त्यात झाडाखाली थांबलेल्या लोकांचा दुसरा नंबर लागतो.

समजूत : पावसाळी हवामानात मी घरातच राहीलो, तर मी सुरक्षित आहे.

वास्तव : पावसाळी/वादळी हवामानात घरात राहणे हे निश्चितच चांगले आहे, पण पूर्ण सुरक्षित आहे असे नाही. वीज-प्रवाह ज्याच्यातून वाहू शकतो, अशा गोष्टी असुरक्षित आहेत. उदा. बाहेरुन घरात येणारी ओली पाऊलवाट, टेलिफोनच्या-टिव्हिच्या-विजेच्या तारा, विजेची उपकरणे, तसेच नळ (अगदी प्लॅस्टिकचे नळ-ज्यातून पाणी वाहत असते). लोखंडी दारे, खिडक्या इत्यादी, विजेचा कडकडाट होत असताना खिडकीजवळ उभे राहणे धोकादायक असते. त्यापेक्षा खोलीत आतील भागात राहणे जास्त सुरक्षित असते.

समजूत : मैदानी खेळ चालू असतांना विजेचा कडकडाट झाला, पाऊस आला, तरी आसरा घ्यायच्या ऐवजी खेळ संपेपर्यंत खेळत राहिले पाहिजे. धातूनिर्मित वस्तु, अंगावरील धातूचे दागिने, घड्याळ, पाठीवरील पिशव्या विजेला आकर्षित करतात.

वास्तव : मैदानी खेळात वीज पडून मृत्युमुखी पडणे/जखमी होणे ह्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. आयुष्यापेक्षा कुठलाही खेळ महत्त्वाचा नसतो. मैदानी खेळ खेळणाऱ्या व्यक्तीनी कडाडणाऱ्या विजेपासून संरक्षण मिळवण्यासाठी आधीच एक योजना बनवावी आणि ती सर्वांना माहिती करुन द्यावी. त्याप्रमाणे वागणे बंधनकारक करावे. वरील हवामानात विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. तर सुरक्षित जागेत त्वरित आसरा घ्यावा, लहान मुलांचे संरक्षण करणे, ही मोठ्याची जबाबदारी आहे, हे विसरु नये.

समजूत : धातूनिर्मित वस्तु, अंगावरील धातूचे घड्याळ, पाठीवरील पिशव्या विजेला आकर्षित करतात.

वास्तव उंच, टोकदार आणि एकाकी जागा ह्यांच्यावर वीज पडणे ह्याची शक्यता जास्तीत-जास्त असते. त्यामुळे धातूनिर्मित वस्तू असल्या तरी काही फरक पडत नाही. डोंगर जरी दगडा-मातीचे असले, तरी त्यावर दर वर्षी अनेकदा वीज कोसळते. विजेचा कडकडाट सुरु झाला तर प्रथमतः चांगले संरक्षण मिळेल असा आसरा विनाविलंब घ्यावा. अंगावरील दागिने काढण्यात वेळ घालवू नये किंवा जिथे नीट संरक्षण मिळणार नाही, अशी जागा टाळावी. धातू विजेला जरी आकर्षित करत नसेल, तरी पण ज्यांची लांबी धातूनिर्मित वस्तू (तारेची कुंपणे, कठडे, वाहने इ.) धोकादायक असतात, त्यापासून दूरच राहवे. वीज जर कोसळली, तर अशा वस्तू वीज भारवाहक असल्याने ती प्रवाहित वीज अगदी 100 मीटर अंतरापर्यंत येऊन एखाद्या व्यक्तीला मृत्युदंड देवू शकते.

समजूत : वादळी हवामान, विजा कडकडत असतांना जर एखादी व्यक्ती त्यात अडकली, तर जमिनीवर लोटांगण घालणे हे सुरक्षित. जर वीज पडण्याची शक्ता असेल, तर टोकदार सुळक्याच्या जवळ 45 च्या शंकुक्षेत्रात पोहोचल्याने वीजक्षतीपासून संरक्षण मिळते.

वास्तव : ही अगदी कालबाह्य व पूर्ण चुकीची समजूत आहे. खरे पाहता जमिनीवर बसावे, दोन्ही गुडघे एकत्र करून त्यात डोके खुपसावे आणि दोन्ही हातांनी पायांना मिठी मारून बसावे, जमिनीवर वीजप्रवाह वाहू लागल्यास तो 30 मीटर पर्यंतसुध्दा वाहतो आणि तो धोकादायक असू शकतो. जरी जमिनीवर झोपल्याने पडणाऱ्या विजेपासून संरक्षण मिळण्याचे प्रमाण वाढते, ही गोष्ट चांगली, तरी जमिनीवरुन प्रवाहित विजेचा धोका वाढतो, ही गोष्ट वाईटच. त्यामुळे कमीत-कमी उंचीवर असणे व जमिनीशी कमीत-कमी स्पर्श असणे, ह्याची सांगड घालायची असेल, तर वरील कृती करणे, हेच जास्त सुरक्षित. खरे पाहता, घराबाहेर जाताना वादळी हवामान टाळणे हेच महत्त्वाचे ठरते. हा उपाय अगदी शेवटचा.

समजूत : जर वीज पडण्याची शक्यता असेल, तर टोकदार सुळक्याच्या जवळ 45 च्या शंकूक्षेत्रात पोहोचल्याने वीजक्षमतेपासून संरक्षण मिळते.

वास्तव : “शंकुक्षेत्र संरक्षण” हा समज चुकीचा आहे. उंच इमारती, सुळके ह्यांच्यावर वीज पडण्याची जास्तीत-जास्त शक्यता असते, तरीही त्याच्या जवळपास असणाऱ्या व्यक्ती, वस्तू यावर वीज पडणारच नाही असे नाही. त्यावरही वीज पडू शकते. शिवाय उंच इमारती, सुळके ह्यांच्यावर वीज पडली, तर त्याच्या 30 मीटरच्या परिघात असलेल्या व्यक्तीवर पण त्याचा आघात होऊ शकतो, आणि जर वीज ज्यावर पडली असते, त्या वस्तूला स्पर्श झाला किंवा वीजस्फोटाच्या परिघात जरी एखादी व्यक्ती असेल, तरी मृत्युदंड निश्चितच, त्यामुळे हे लक्षात घ्यावे की, विजेचा कडकडाट होत असतांना बाहेर जाणे टाळणे, हेच इष्ट. वीजप्रपात हा कधीही तथाकथित “शंकुक्षेत्रात” होऊ शकतो.

वीज पडून मृत्यू होण्याची भारतातील आकडेवारी फार मोठी आहे. दरवर्षी शेकडो लोक अशाप्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे आपले प्राण गमावतात. बऱ्याच घटनांमध्ये जागरुकता नसल्यामुळे मृत्यू होतात. अशा वेळी वरील स्वरक्षण पध्दतीचा अवलंब केल्यास वीजेपासून स्वत:चे व इतरांचे संरक्षण करण्यास नक्कीच मदत होईल.

जिल्हा माहिती कार्यालय

जालना

 

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 2 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे