pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

जामखेड येथे उपोषणकर्त्यांची पालकमंत्री अतुल सावे यांनी घेतली भेट; सकारात्मक चर्चेनंतर उपोषणकर्त्यांनी घेतले उपोषण मागे.

0 1 7 4 0 8

जालना/प्रतिनिधी,दि. 25

 धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी अंबड तालुक्यातील जामखेड येथे उपोषणास बसलेल्या आंदोलकांची आज पालकमंत्री अतुल सावे यांनी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.

धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून  आरक्षण मिळावे यासाठी शासन सकारात्मक आहे. तसेच धनगर समाजाच्या मागण्यांवर निश्चितपणे निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट करून आंदोलनकर्त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती पालकमंत्री यांनी केली. दरम्यान, विनंतीला मान देऊन आंदोलनकर्त्यांनी आपले उपोषण मागे घेतले.

यावेळी रोहयो मंत्री  संदिपान भुमरे,  आमदार नारायण कुचे,  जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ,अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, तहसीलदार चंद्रकांत शेळके हे उपस्थित होते.

 

पालकमंत्री अतुल सावे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. यावेळी उपोषणकर्त्यांशी चर्चा करताना त्यांनी  धनगर समाजाला अनुसूचित जमातीतून आरक्षण मिळावे यासाठी शासनाने केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे यासाठी शासनाने स्थापन केलेल्या अभ्यास समितीबाबत आंदोलनकर्त्यांना सविस्तर माहितीही दिली. समितीचा अहवाल प्राप्त होताच योग्य निर्णय घेतला जाईल. तसेच आरक्षणाबाबत पुढील आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार असल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले की, बैठकीत धनगर समाजाच्या अन्य मागण्यांवरही निर्णय घेण्यासाठी चर्चा केली जाईल. जालना शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक उभारण्यासाठी ठोस निर्णय घेतला जाईल. धनगर समाजाच्या विविध योजनांसाठी पुरेसा निधीही उपलब्ध करून दिला जाईल. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात घडलेल्या अनुचित प्रकार प्रकरणी दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी योग्य ती कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान,  सकारात्मक चर्चा झाल्यानंतर उपोषणकर्त्यांनी पालकमंत्री यांच्या हस्ते सरबत घेऊन आपले उपोषण मागे घेतले. यावेळी धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे