स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक -2025 सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध कायद्यांतर्गत कार्यवाही
जालना/प्रतिनिधी,दि.7
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन निवडणूकीच्या कालावधीमध्ये जिल्ह्यातील निवडणूक होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था तसेच सदर निवडणूकीवर प्रभाव पडणारे लगतचे ग्रामीण क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक मालमत्तेची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरुपात विद्रुपता करण्यास निवडणूक प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत. असे आदेश जिल्हादंडाधिकारी आशिमा मित्तणल यांनी जारी केले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक – 2025 साठी दि. 4 नोव्हेंबर 2025 रोजी कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आलेली आहे. त्यानुसार जालना जिल्ह्यातील परतूर, अंबड, भोकरदन या नगरपरिषदांच्या सार्वत्रीक निवडणूक कार्यक्रम घोषित केलेला आहे. काही व्यक्ती, संस्था यांच्याकडून मोठ्या प्रमाणात अनाधिकृत होर्डींग्ज, बॅनर्स, पोस्टर्स व जाहिराती लावून शहरांचे विद्रुपीकरण करण्यात आले आहे. तसेच निवडणूक कालावधीत राजकीय पक्ष अथवा पक्षांशी संबंधीत व्यक्ती, संस्था यांचेकडून होर्डींग्ज, बॅनर्स, पोस्टर्स व जाहिराती लावून सार्वजनिक मालमत्तांचे विद्रुपीकरण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्य निवडणूक आयोगाने मालमत्ता विद्रुपीत करण्यास प्रतिबंध करण्यासंबंधी दिलेल्या आदेशांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत सुचित केल्यानुसार जिल्ह्यातील निवडणूक होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था तसेच सदर निवडणूकीवर प्रभाव पडणारे लगतचे ग्रामीण क्षेत्रामध्ये निवडणूकीच्या कालावधीमध्ये होर्डींग्ज, बॅनर्स, पोस्टर्स व जाहिराती प्रदर्शीत करताना संबंधित स्थानिक प्राधिकरणाची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक आहे. तसेच परवानगी कालावधी संपल्यानंतर इमारती, मालमत्ता पुर्ववत करुन घेणे, जाहिराती तात्काळ काढून घेणे आवश्यकआहे.

