जालन्यात 4 मार्चपासून वॉटरशेड यात्रा 4 गावामध्ये विविध कार्यम्रम व उपक्रमांचे आयोजन
जालना/प्रतिनिधी,दि.3
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक 2.0 अंतर्गत पाणलोट विषयक कामाचे महत्त्व विशद करून या कामात लोकांचा सहभाग वाढावा या दृष्टीने जनजागृती व प्रसिद्धी करण्यासाठी केंद्र शासनाच्या भूसंसाधन विभाग व मृद व जलसंधारण विभाग महाराष्ट्र राज्य व वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यामध्ये वॉटरशेड यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे सदर यात्रेच्या रूट मॅप नुसार जिल्ह्यात 4 मार्च रोजी वॉटरशेड यात्रा येणार आहे. ही यात्रा जाफ्राबाद व अंबड तालुक्यातील 4 गावात जाणार असून 5 तारखेपर्यंत जिल्ह्यामध्ये राहणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
मृदा व जलसंधारण विभाग, जालना यांच्या अंतर्गत जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यात एक व अंबड तालुक्यातील एक क्लस्टर मध्ये पाणलोट कामे मागील तीन वर्षापासून सुरू आहेत. या कामाविषयी जनजागृती करून कामाची माहिती ग्रामीण भागातील जनतेला व्हावी यासाठी सरकारने वॉटरशेड यात्रा सुरू केलेली आहे. ही यात्रा एका दिवसात दोन गावे करणार असून या गावात विविध कार्यक्रम घेतले जात आहेत. या रथयात्रेची सुरुवात जाफ्राबाद तालुक्यातील माहोरा या गावापासून चार मार्च रोजी सकाळी 9.00 वाजता होणार आहे. तसेच दुपारी 2 वाजता यात्रा आरदखेडा गावात दाखल होईल. 5 मार्च रोजी ही यात्रा अंबड तालुक्यातील खेडगाव व रोहिलागड या गावांमध्ये यात्रा जाणार आहे. यानिमित्त प्रत्येक गावात यात्रेनिमित्त प्रभात फेरी, ग्रामसभा, महीला बचतगट बैठका आदी कार्यक्रम घेण्यात आले आहे. या यात्रेत ग्रामस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ, जिल्हा जलसंधारण अधिकारी एस.एस.वाघमारे, उपविभागीय जलसंधारण अधिकारी ऋतुजा देसाई, जिल्हा प्रकल्प समन्वयक तुकाराम भोजने आदींनी केले आहे.
विविध स्पर्धाचे आयोजन
वॉटर शेड यात्रेनिमित्त गावात वातावरण निर्मिती व्हावी यासाठी चार गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शालेय विद्यार्थ्यांच्या सगळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा घेण्यात आले आहेत. या स्पर्धेतील यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना यात्रेतील मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमात पाणलोट योद्धायोध्दा व धारिणी ताई यांनाही सन्मान चिन्ह दिले जाणार आहे.
मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून प्रसार
वॉटर शेड यात्रेमध्ये शासनाकडून मोबाईल व्हॅन उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या व्हॅन मध्ये प्रकल्पाच्या संबंधित माहिती देण्यात येईल. तसेच पाणलोट विषय कामाच्या चित्रफिती या याच्या माध्यमातून ग्रामस्थांना दाखविल्या जातील. हा रथ गावात दाखल झाल्यानंतर सुरुवातीला प्रकल्पाचा प्रसार व प्रचार केला जाईल.
ग्रामस्थांना दिली जाणार शपथ
वॉटरशेड यात्रा गावात दाखल झाल्याच्या नंतर प्रमुख वक्त्यांचे मार्गदर्शन होईल. यानंतर शालेय मुलांच्या स्पर्धांचे बक्षीस वितरण केले जाईल. गावातील युवक, महिला बचत गटाच्या सदस्य व स्वयंसेवक एकत्र येऊन श्रमदान करतील व परिसरात वृक्ष लागवड करण्यात येईल. यानंतर ग्रामस्थांना हातात माती घेऊन पाणलोट विषयी शपथ दिली जाणार आहे.
वरील माहिती जिल्हा जलसंधारण अधिकारी मृद व जलसंधारण विभाग यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.