pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

जालन्यात गुंतवणूक परिषद उत्साहात संपन्न  उद्योगासाठी गुंतवणूकदारांना  प्रशासनाचे संपूर्ण सहकार्य राहिल – जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ

गुंतवणूक परिषदेत 1 हजार 316 कोटींचे सामंजस्य करार   5 हजारांपेक्षा जास्त तरुणांना उपलब्ध होणार रोजगार

0 1 7 4 0 9

जालना/प्रतिनिधी,दि.15

देशात जालना शहराची स्टिल सिटी म्हणून ओळख निर्माण झालेली आहे. यात आणखी भर टाकण्यासाठी जालना शहराला सीड पार्क बनवून त्यात आणखी गुंतवणूक वाढवू शकते. औद्योगिक परिसरातील सर्व कंपन्यांची गुंतवणूक फार मोठी आहे. उद्योजक घडविण्यात रसायन तंत्रज्ञान संस्थेचाही मोलाचा वाटा आहे. आजच्या गुंतवणूक परिषदेत नवउद्योजकांनी महाराष्ट्र शासनासोबत 1 हजार 316 कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले असून याची फलनिष्पत्ती म्हणजे 5 हजार 932 तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहेत. उदयोगासाठी गुंतवणूकदारांना नेहमीच प्रशासनाचे संपूर्ण सहकार्य राहिल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली.
शासनाच्या उद्योग संचालनालयाकडून जालना जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद जालना येथील रसायन तंत्रज्ञान संस्थेच्या सभागृहात आज संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उद्योग सहसंचालक बी.टी. यशवंते, रसायन तंत्रज्ञान संस्थेचे संचालक उदय अन्नपुरे, उद्योजक सुनिल रायठठ्ठा, जिल्हा उद्योग केंद्राचे  व्यवस्थापक अजिंक्य अजगेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.पांचाळ म्हणाले की, जालना जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्यासाठी तसेच जिल्ह्यातील उद्योजकांना एकत्र आणण्यासाठी जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. आजच्या परिषदेत जिल्ह्यातील विविध क्षेत्रांमध्ये 1316 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आलेली आहे. यातून रोजगार वाढीस गती मिळणार आहे. तसेच शहरासह जिल्ह्याच्या विकासात भर पडणार आहे. 1316 कोटी रुपयांचा आकड्यावर न थांबत आणखीन जवळपास 1 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक नव्याने होईल, असेही त्यांनी सांगितले.
ड्रायपोर्टचे नुकतेच लोकार्पण झाले असून 450 कोटी रुपये खर्चून 400 एकर जमीनीवर ते तयार झालेले आहे. यामुळे आपला माल निर्यातीसाठी उद्योजकांना व शेतकऱ्यांना वाहतुकीचा खर्चही कमी होण्यास मदत होणार आहे. नवीन गुंतवणूक होणार असेल तर जमीन हा मुद्दा प्रकर्षाने सामोरे येत असतो. प्रशासनाकडून तो तातडीने सोडविला जाईल. छत्रपती संभाजीनगर ते जालनापर्यंतचा परिसर हा भविष्यामध्ये नक्कीच एक मोठा इंडस्ट्रियल झोन तयार होऊ शकतो. भारतीय अर्थव्यवस्थेत सर्व औद्योगिकसह सेवा, क्षेत्राचे मोलाचे योगदान आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम व पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या माध्यमातून नवीन उद्योजकांनी आपल्या उद्योगात यश प्राप्ती करावी, असे आवाहनही डॉ. पांचाळ यांनी केली.
आजच्या गुंतवणूक परिषदेत 42 नवउद्योजकांना  प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात आला. यावेळी उद्योजक किशोर देविदान, सुनिल रायठठ्ठा आणि उदय अन्नपुरे यांची समयोचित भाषणे झाली. प्रास्ताविक उद्योग सहसंचालक बी.टी. यशवंते यांनी केले. सुक्ष्म व लघु उद्योग उभारणीसाठी  तसेच नवउद्योगांना चालना देण्यासाठी शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राकडून उद्योजक घडविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या निवासी व अनिवासी प्रशिक्षण योजनांची माहिती त्यांनी दिली. तसेच औद्योगिक परिसर उभारणीत जिल्हा उद्योग केंद्राची महत्वाची भूमिका असल्याचेही स्पष्ट केले. गुंतवणूक परिषदेची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन करण्यात आली. सूत्रसंचालन प्रकल्प अधिकारी भारती सोसे यांनी केले तर आभार जिल्हा उद्योग केंद्र व्यवस्थापक अजिंक्य अजगेकर यांनी मानले. या परिषदेस नवउद्योजक, व्यावसायिक, पदाधिकारी, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे