हिंदू नव वर्षा निमित्त उरण शहरात शोभयात्रा.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.9
हिंदू धर्मात नवीन वर्ष हा गुडीपाडवा सणाला साजरा होत असतो. हिंदू धर्मात गुडीपाडवा सणाला नवीन वर्षाची सुरवात करतात. गुडीपाडवा सणाला हिंदू धर्मात अत्यंत महत्वाचे स्थान आहे. अत्यंत पवित्र व महत्वाचे असलेल्या गुडीपाडवा या सणाचे औचित्य साधून दरवर्षी प्रमाणे याहिवर्षी उरण शहरात भव्य दिव्य असे शोभयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. जेष्ठ नागरिक मंडळ उरण, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, सकल हिंदू समाज यांच्या माध्यमातून उरण शहरात गुडीपाडवा निमित्त शोभयात्रा काढण्यात आली. या शोभा यात्रेत हिंदू धर्म रीती रिवाज धर्म परंपरे नुसार नागरिकांनी वेशभूषा परिधान केले होते.एन आय हायस्कुलचे शिक्षक एस एस पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील मुलींनी लेझिम सादर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तर प्रसिद्ध गायक भारत पाटील यांच्या भजन मंडळाने अभंग व भक्ती गीते सादर करून सर्वांना मंत्र मुग्ध केले. उरण शहरात पेन्शनर्स पार्क येथून शोभा यात्रेला सुरवात झाली. स्वामी विवेकानंद चौक, गणपती चौक, एन आय हायस्कुल मार्गे पेन्शनर्स पार्क या मार्गावर शोभायात्रा काढण्यात आली. विशेष म्हणजे या शोभयात्रेत महिलांसह जेष्ठ नागरिकांचाही मोठया प्रमाणात सहभाग होता. अत्यंत उत्साहात व शांततेत शोभा यात्रा संपन्न झाली. या शोभा यात्रेत जेष्ठ नागरिक मंडळ उरण, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, सकल हिंदू समाज तसेच विविध सामाजिक संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठया प्रमाणात सहभागी झाले होते.