शिव व्याख्याते धिरेंद्र ठाकूर यांचे व्याख्यानाने प्रभावित होऊन दुंदराई गावातील शेकडो शिवप्रेमीं चे रायगडावर प्रस्थान

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.22
उरण तालुक्यातील पाणदिवे गावातील सुप्रसिद्ध शिवव्याख्याते सह्याद्री रत्न धिरेंद्र ठाकूर अभ्यासपूर्ण शिव चिंतनातून नुकत्याच झालेल्या १९ फेब्रुवारीच्या २०२५ च्या शिवजयंती निमित्ताने एकाच दिवशी पाच ठिकाणी व्याख्यानमालेतून शिव विचारांचा जागर घालण्यात आला.
गतवर्षी १९फेब्रुवारी २०२४ ला एकाच दिवशी चार व्याख्यान देण्याचं उल्लेखनीय काम त्यांच्या हातून झालं होतं. अगदी यावर्षीही त्यांनी एकाच दिवशी गाव आणि शहरात पाच ठिकाणी व्याख्यान देऊन शिवचरित्राचा जागर प्रभावीपणे मांडला.
१९ फेब्रुवारीला २०२५ च्या शिवजयंती निमित्त प्रथम रायगड जिल्हा परिषद शाळा करवले, नंतर पेण -दादर तसेच पनवेल मधील सर्वात मोठी रहिवासी कॉलनी बालाजी सिंफोनी येथे, त्याच्यानंतर दुंदराई गावात व्याख्यान झाल्यानंतर करंजाडे पनवेल येथे निवेदनात्मक व्याख्यान देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तुत्वाचा, नेतृत्वाचा गौरवशाली इतिहास दाखले देऊन आपल्या अनोख्या शैलीतून त्यांनी प्रभावीपणे मांडला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी व त्यांच्या प्रेरणेतून निर्माण झालेले एक नव्हे तर चार स्वराज्य ,तसेच इतिहासातील दुसरी पावनखिंड, छत्रपतींचा साम्राज्य नव्हे स्वराज्य ,कोकण किनारपट्ट्यातील स्वराज्यासाठी खर्चिक पडलेले मावळे अशा विविध विषयांवर अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले.
यामध्ये दुंदराई गावात झालेल्या व्याख्यानात उपस्थित शिवप्रेमींना ‘एकदा तरी रायगड किल्ला पहावा’ असे अवाहन केल्यानंतर व्याख्यानातून प्रेरणा घेऊन गावातील लहान मुलं, विद्यार्थी, तरुण ,प्रौढ, शिवप्रेमी धरतीवरील स्वर्ग म्हणजे रायगड किल्ला भेट देण्यासाठी सज्ज झाले आणि त्यांनी शिवछत्रपतींच्या स्वराज्याची प्रत्यक्ष माहिती घेतली.विशेष म्हणजे दुंदराई गावातील ,रायगड जिल्हा परिषदेचे आदर्श ,प्रामाणिक आणि गुणवंत शिक्षक संतोष पाटील यांनी रायगडाला भेट देण्यासाठी पुढाकार घेऊन त्याचं नियोजन व संयोजन केले. सन्माननीय ग्रामस्थांनी ,दानशूर व्यक्ती, समाजसेवकांनी या स्तुत्य उपक्रमासाठी सर्वतोपरी मदत केली व त्यात सहभागी झाले होते.