मराठी पत्रकार दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

जालना/प्रतिनिधी,दि.06
मराठी पत्रकार दिनानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयातीत सभागृहात आज आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
स्वातंत्र्यपूर्व काळापासून देशाच्या जडण-घडणीत वृत्तपत्र माध्यमांची नेहमीची महत्वाची भूमिका राहिलेली आहे. पत्रकारिता हे लोकशिक्षण व समाजशिक्षणाचे एक महत्वाचे माध्यम देखील आहे त्यामुळे पत्रकारीतेला चौथा स्तंभ ही उपमा देण्यात आलेली आहे. समाजाच नैतिकतेची जबाबदारी पत्रकारांच्या लेखणीतून निर्माण होत असते. आज पत्रकारितेच्या माध्यमातून आपणांस जगातील सर्व घडामोडींची माहिती तात्काळ मिळते. लोकशाही प्रणालीमध्ये सकारात्मक आणि नकारात्मक बातमीचे वस्तुनिष्ठ लेखन करणारा पत्रकार अत्यंत महत्वाचा घटक आहे. पत्रकार समाजाचे प्रतिनिधीत्व करतो. त्यामुळेच समाजाची जडण घडण होण्यास पत्रकार महत्वाची भूमिका पार पाडतात. पत्रकार हा प्रतिकुल परिस्थितीत निर्भिडपणे आपले कार्य करत समाजा दैनंदिन सर्व घडामोडी पोहचविण्याचे काम करतो. यापुढेही पत्रकारांनी लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची समाजामधील विश्वासार्हता जोपासत आपले कार्य करावे, असे सांगून डॉ. पांचाळ यांनी मराठी पत्रकार दिनाच्या सर्व पत्रकारांना पुष्प भेट देवून शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी यांनी प्रशासन आणि पत्रकार यामधील दुवा म्हणून माहिती कार्यालय काम करते. प्रशासनाच्या दैनंदिन होणाऱ्या उपक्रमामध्ये पत्रकारांची नेहमी महत्वाची भूमिका असून, त्यांचे नेहमी सहकार्य होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी, यांच्यासह जिल्ह्यातील संपादक, पत्रकार बांधवांची प्रमुख उपस्थिती होती.
*****