pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

मुंबई शहर जिल्ह्यातील प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध मतदारांनी आपले नाव तपासून सहकार्य करावे – जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर

0 1 7 4 1 4

मुंबई, दि. 27

मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांच्या मतदान केंद्राची यादी व प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून मतदारांनी या याद्यांचे अवलोकन करून हरकती असल्यास 9 डिसेंबर 2023 पर्यंत त्या नोंदवाव्यात, असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी केले आहे.
मतदान केंद्र आणि प्रारुप मतदार यादीबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी श्री.क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस उपमुख्य निवडणूक अधिकारी रवींद्र राजपूत, तहसीलदार अर्चना मुळे, विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
मतदार यादीबाबत माहिती देताना श्री.क्षीरसागर म्हणाले की, दि. 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत भारत निवडणूक आयोगाने मुंबई शहर जिल्ह्यातीत 10 विधानसभा मतदारसंघातील एकूण 2509 मतदान केंद्रांच्या सुसूत्रीकरणाच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. या मतदान केंद्रांची यादी तसेच प्रारुप मतदार यादी मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाच्या www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालय तसेच मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदार संघ कार्यालयातील सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. मतदारांनी या मतदार यादीचे अवलोकन करून दावे व हरकती असल्यास विहीत अर्ज नमुना क्रमांक सहा, सात व आठ भरून दि. 9 डिसेंबर 2023 पर्यंत संबंधित विधानसभा मतदार संघामध्ये नोंदवाव्यात.
या प्रारुप मतदार यादीतील एकूण मतदारांची संख्या 24 लाख 50 हजार 355 एवढी आहे. यामध्ये 8920 इतकी नवीन मतदार नोंदणी आहे. तर दुबार, मृत अथवा कायमस्वरूपी स्थलांतरित अशा 6107 मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. प्रारुप मतदार यादीतील पुरुष मतदारसंख्या 13 लाख 27 हजार 131 तर स्त्री मतदार संख्या 11 लाख 23 हजार 18 इतकी आहे. ऑक्टोबर 2023 मधील यादीमध्ये एक हजार पुरूषांच्या मागे 846 स्त्रिया असून तृतीयपंथी समुदायाची ऑक्टोबर 2023 मधील संख्या 206 इतकी असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. बूथ लेवल ऑफिसर (बीएलओ) यांनी घरोघरी जाऊन मतदार यादी अद्ययावत केली आहे. याद्वारे सुमारे 98 टक्के काम पूर्ण झाले असल्याचे श्री.क्षीरसागर यांनी सांगितले.
लोकसंख्येच्या प्रमाणात 18 ते 19 वर्षे वयोगटाच्या तरुणांचे प्रमाण सुमारे तीन टक्के आहे. तथापि, मतदार यादीतील त्यांचे प्रमाणे अर्धा टक्के आहे. यासाठी मुंबई शहर जिल्ह्यामध्ये युवा मतदारांची नोंदणी वाढवण्यासाठी महाविद्यालयांमध्ये विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच ‘उत्कृष्ट मतदार मित्र महाविद्यालय पुरस्कारा’चे आयोजनही करण्यात आले आहे. शंभर टक्के मतदार नोंदणी केलेल्या आणि मतदार जागृतीचे उपक्रम राबवणान्या महाविद्यालयांना हे पुरस्कार दिले जाणार आहेत. महिला मतदारांचे प्रमाण वाढणे देखील आवश्यक असून यासाठी सहकारी गृहनिर्माण संस्थांना आवाहन करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी श्री.क्षीरसागर यांनी सांगितले.
सर्व पात्र नागरिकांची नावे मतदार यादीत यावीत यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. तथापि, मतदारांनी प्रारुप यादी तपासून त्यात नाव असल्याची खात्री करून सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे