कामगारांना कामावर घेऊन शोषण थांबवा : महेंद्रशेठ घरत
कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन दिला धीर

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.1
१ मे म्हणजे जागतिक कामगार दिन. या जागतिक कामगार दिनी कामगारांना रस्त्यावर आणणारे बेजबाबदार कंत्राटदार असो वा एचपीसीएल व्यवस्थापन त्यांनी कंत्राटी कामगारांचे शोषण थांबवावे आणि कामगारांना तातडीने कामावर रुजू करून घ्यावे. कारण येथील भूमिपुत्रांच्या जमिनी प्रकल्पासाठी कवडीमोल दराने संपादन केलेल्या आहेत, त्यामुळे भूमिपुत्रांचा येथील रोजगारावर हक्कच आहे, त्यांना कामावरून काढून टाकणे, हा गुन्हाच म्हणावा लागेल, असे मत आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी रसायनी येथील एचपीसीएलच्या गेटवर उपोषणकर्त्यांसमोर मांडले.
कंपनी व्यवस्थापन कंत्राटदाराला किती पैसे देते, कंत्राटदार कामगारांना किती पगार देतो, त्यात मॅनेजमेंटचा हिस्सा किती, याचा जाब विचारणे चूक नाही. त्यामुळे आपल्या न्याय हक्कांसाठी कामगारांनी संघटना बांधली असेल तर त्यात कामगारांची चूक काय, कायद्यानुसार वेतन हे मिळायलाच हवे आणि अशावेळी २१ कंत्राटी कामगारांना कामावरून कमी केले आहे, हे लाजिरवाणे आहे. गेले दहा महिने हे स्थानिक कामगार बेरोजगार आहेत, त्यांना योग्य न्याय देण्यासाठी मी सर्वोतोपरी प्रयत्न करीन.मध्यंतरी आमदार महेश बालदी यांनीही कंत्राटदारांना समज दिली होती तरीही व्यवस्थापन वा ठेकेदार मुजोरीने वागत असेल तर तुम्हाला तुमची जागा दाखवणारच, असा इशारा आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी यावेळी दिला.न्यू मॅरिटाईम अण्ड जनरल कामगार संघटनेच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक बेरोजगार २१ कामगारांनी चार दिवसांपासून एचपीसीएलच्या गेटसमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणस्थळी महेंद्रशेठ घरत यांनी कामगार दिनी भेट देऊन कामगारांशी संवाद साधला आणि मार्गदर्शन केले.यावेळी जेष्ठ नेते नाना म्हात्रे, युवा नेते निखिल डवले, रजनीकांत माळी, देविदास म्हात्रे,न्यू मॅरिटाईम अण्ड जनरल कामगार संघटनेचे सरचिटणीस वैभव पाटील, मुरलीधर ठाकूर, अरुण म्हात्रे, आनंद ठाकूर, घनश्याम पाटील,विवेक म्हात्रे, राजेंद्र भगत, किरण कुंभार स्थानिक ग्रामस्थ तसेच शेकडोच्या संख्येने कामगार उपस्थित होते.